ICSE बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा रद्द

देशात कोरोनाचा कहर वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सीबीएसई (CBSE) बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाेही (SSC) दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे.

आयसीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. बोर्डाकडून शाळांना अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तासिकांसाठी वेळापत्रक आखण्यासही सांगण्यात आले आहे.

मागील वर्षी कोरोना संकटामुळे आयसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील गुण, वर्षभरातील कामगिरी आणि प्रॅक्टिकल्सचे गुण यांच्याआधारे गुण देण्यात आले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे दोन पेपर झाले होते. उर्वरित विषयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच बारावीच्या मुलांनाही आधीच्या परीक्षांतील गुण, वर्षभरातील कामगिरी आणि प्रॅक्टिकल्सचे गुण यांच्याआधारे गुण देण्यात आले होते. यंदा परीक्षेसंदर्भातला निर्णय जून महिन्यात परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल.


हेही वाचा -

अखेर राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर


पुढील बातमी
इतर बातम्या