अफगणिस्तानमधील 'त्या' विद्यार्थ्यांसाठी मुंबई आयआयटीची दारं खुली

अफगणिस्तानमध्ये तालिबानी सत्ता स्थापन झाली आहे. तिथल्या नागरिकांमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. अफगणिस्तानमधील काही विद्यार्थ्यांनाही आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. आयआयटी मुंबईत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणारे ११ विद्यार्थी अफगाणिस्तानमधील आहेत. त्यांना विशेष परवानगी म्हणून आयआयटी संकुलाचे दार खुले करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांनी भारतात यावं या उद्देशानं 'इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स' (आयसीसीआर) हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाअंतर्गत विविध देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी भारतात संधी दिली जाते.

अफगाणिस्तानमधील विद्यार्थीही देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये संधी मिळाली आहे. यामध्ये आयआयटी मुंबईत ११ विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यामुळे हे विद्यार्थी त्यांच्या घरी होते.

मात्र आता तिथली परिस्थिती पाहता या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशानं अपवादात्मक परिस्थिती म्हणून त्यांच्यासाठी संकुल खुले करण्याचा निर्णय घेतल्याचं आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिष चौधरी यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर केलं.

अफगणिस्तानमधल्या ११ विद्यार्थ्यांनी संचालकांकडे विशेष परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असतील आणि लवकरच कॅम्पसमध्ये येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 या विद्यार्थ्यांना तातडीनं व्हिसा मिळावा यासाठी 'आयसीसीआर'ही विशेष प्रयत्न करत आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आयसीसीआरचे काबूल इथं बोलणं झालं आहे. त्यांना लवकरच व्हिसा मिळून ते परत येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा

मुंबईत शिकणाऱ्या अफगणिस्तान विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

पुढील बातमी
इतर बातम्या