अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या स्थानी

अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशनच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईनं दुसरं स्थान पटकावलं आहे. मंगळवारी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईनं हे स्थान कायम ठेवलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाइन पद्धतीनं देशाच्या संशोधनात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली.

अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन पुरस्कारांची सुरुवात २०१८ साली मानव संसाधन विकास विभागाने केली. संशोधन, विकास आणि उद्योजकता या निकषांच्या आधारावर देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठं, महाविद्यालयं यांची क्रमवारी ठरविण्याच्या दृष्टीनं याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, जागरूकता, सुविधा, आर्थिक नियोजन, शिकण्याच्या पद्धती तसेच शिक्षण संस्थांची एकूण पद्धती या निकषांचाही विचार केला जातो.

प्रथम क्रमांक तामिळनाडूच्या आयआयटी मद्रासनं पटकावला आहे. देशातील महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये मुंबईचे वीर जिजामाता टेक्निकल महाविद्यालय आणि आणि गुरू गोविंद सिंहजी इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने स्थान पटकावले. या यादीत पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयानं प्रथम येण्याचा मान मिळविला.

पहिल्या ५० शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या नागपूर येथील विसवेश्वराया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं स्थान प्राप्त केलं. शासकीय संस्थांच्या विभागाच्या विद्यापीठांच्या यादीत मुंबईच्याच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनं प्रथम क्रमांक, तर पहिल्या २५ मध्ये महाराष्ट्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं स्थान मिळविलं आहे.


हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या