आता १०वी, १२वी च्या परीक्षांसाठीही ‘एसओपी’

इयत्ता दहावी आणि बारावीच्या एकाही विद्द्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, यासाठी आता १२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता १० वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याबाबतचं नियोजन करण्यात यावं, त्यादृष्टीने एसओपी बनवून परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

राज्यातील कोरोनाचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेलं तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचं हित लक्षात घेऊन इयत्ता १० वी आणि १२ वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,  राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड,  माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा- 10th, 12th Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

सुधारित कार्यक्रमानुसारच

यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना अवगत केलं जावं तसंच सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत जाहीर केलं जावं, असेही निर्देश दिले.

१२ वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करताना १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीट च्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात  प्रवेश घ्यायचे असतात हे लक्षात घ्यावं, त्यांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

तयारी पूर्ण करा 

आपण ज्या तारखांना १२ व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावं. 

परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचं नियोजन करण्यात यावं, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावं. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी)  शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

(maharashtra cm uddhav thackeray held a meeting on SSC and HSC exams)

हेही वाचा- मुंबई विद्यापीठ परीक्षेची कागदपत्रे इ-मेलवर स्वीकारणार
पुढील बातमी
इतर बातम्या