राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार- उदय सामंत

इतर राज्यातील त्या त्या मातृभाषांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे, अशी शिफारस करण्यात आल्याचं निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केलं. सोबतच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं मराठी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्रात मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन करण्याचं राज्य शासनाने ठरवलं असून त्या अनुषंगाने भाषा सल्लागार समितीच्या पुणे इथं १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीने ठराव पारित केला आहे. वर्धा इथं हिंदी भाषेचं विद्यापीठ, आंध्रात तेलुगू विद्यापीठ तर अन्य प्रांतात संबंधित भाषेची विद्यापीठे आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही (maharashtra) मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं उदय सामंत म्हणाले.

महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचं धोरण ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या शिफारशी व ठरावाचा आढावा घेऊन भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, भाषा विद्यापीठाचे संकुल, प्रशासकीय यंत्रणा, शैक्षणिक विभाग, भाषा प्रयोगशाळा, विद्यापीठाची केंद्रे, कर्मचारी वर्ग, न्यायालयीन कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर, प्रशासन व नवतंत्रज्ञानात मराठीचा वापर इत्यादी बाबींवर शिफारस करण्यासाठी राज्य शासन लवकरात लवकर समिती गठीत करेल.

हेही वाचा- बीएमसी प्रभागांच्या आरक्षणात १० वर्षांनी होणार बदल

राज्यात मराठीला शोभेल असे देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्थापन करेल. यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत सांगितलं.

राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावं ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे. महाराष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावं, अशी मागणी अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपीठावरून अनेक वेळा करण्‍यात आली. परंतु, गेल्या ६० वर्षांत त्‍याला मूर्त स्‍वरूप आलेलं नाही. काही वर्षांपूर्वी वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील बँडस्टँड इथली जागा मुंबई महापालिकेने (bmc) विद्यापीठाला देण्‍याचं मान्‍य केलं होतं.

(maharashtra government will form marathi language university in state says uday samant)

हेही वाचा- सचिन वाझे यांची तात्काळ बदली, गृहमंत्र्यांची घोषणा
पुढील बातमी
इतर बातम्या