Advertisement

बीएमसी प्रभागांच्या आरक्षणात १० वर्षांनी होणार बदल

मुंबई महापालिका प्रभागांच्या आरक्षणात आता दहा वर्षांनी बदल होणार आहे. याआधी प्रभागांच्या आरक्षणात दर पाच वर्षांनी बदल होत होता.

बीएमसी प्रभागांच्या आरक्षणात १० वर्षांनी होणार बदल
SHARES

मुंबई महापालिका प्रभागांच्या आरक्षणात आता दहा वर्षांनी बदल होणार आहे. याआधी प्रभागांच्या आरक्षणात दर पाच वर्षांनी बदल होत होता. त्यामुळे  पाच वर्षे बांधलेल्या प्रभागावर अनेक वेळा नगरसेवकांना पाणी सोडावे लागतं.  त्यामुळे प्रभागांच्या आरक्षणात दर दहा वर्षांनी बदल करावा, अशी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची ठरावाची सूचना बहुमताने पालिका महासभेत मंजूर केली आहे. 

महापालिकेच्या प्रभागांची फेररचना दर दहा वर्षांनी तर प्रभागांचे आरक्षण पाच वर्षांनी बदलण्यात येते. खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, महिला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा आरक्षणानुसार प्रभागाचे आरक्षण केले जाते. मुंबईतील २२७ पैकी ५० टक्के प्रभाग हे खुल्यासह विविध प्रभागातील महिलांसाठी राखीव असतात. यावर्षी खुल्या वर्गासाठी असलेला प्रभाग पुढील निवडणुकीत इतर प्रवर्गासाठी किंवा महिलांसाठीही आरक्षित होऊ शकतो. त्यामुळे अनेक वेळा नगरसेवक आजूबाजूच्या विभागात कामे करण्यास सुरुवात करतात. त्याचा परिणाम त्यांच्या प्रभागावर होतो, असं निदर्शनास आणत दर दहा वर्षांनी प्रभागाचे आरक्षण बदलावे, अशी विनंती जाधव यांनी सभागृहापुढे केली होती.

भाजपने या सूचनेला विरोध केला आहे. आरक्षणात दहा वर्षांनी बदल करण्यासाठी पालिका अधिनियमात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विधिमंडळाच्या संमतीने सुधारणा करू शकते. परंतु अशी सुधारणा करताना भारतीय राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत आणि समान अधिकारांची पायमल्ली करू शकते काय? मूलभूत आणि समान अधिकारावर आपण गदा आणू शकतो का? असा सवाल भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. या ठरावाचे विरोधी पक्षनेते रवी राजा आणि गटनेत्या राखी जाधव यांनी समर्थन केले. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मतास टाकून बहुमताने मंजूर केला. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा