१७ आॅगस्टपासून शाळा सुरू करण्यावर सरकारचं घुमजाव?

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या घोषणेवर घुमजाव केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांपुढं पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढं ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसंच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसंच शहरी भागात ८ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे, असं जाहीर केलं होतं.

तेव्हापासून राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झालं होतं. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता वाढू लागली. मात्र, बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता निर्माण करण्याबाबतच्या घोषणा करतानाच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असं स्पष्ट केलं. 

हेही वाचा- १५ ऑगस्टपासून मॉल, हॉटेलसोबतच 'या' गोष्टींवरील निर्बंध होणार शिथिल, पण...

यावरून संभ्रम पुन्हा वाढल्यानंतर प्रसारमाध्यमांनी वर्षा गायकवाड यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्याला आमचं नेहमीच प्राधान्य राहिलेलं आहे. त्यानुसारच निर्णय घेणं हे टास्क फोर्स आणि सरकारचंही धोरण आहे. टास्क फोर्स आणि राज्य सरकार यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या एसओपींचा अभ्यास केला जाईल. त्यासंदर्भात येत्या दोन-चार दिवसांमध्ये बैठक होईल आणि त्यामध्ये शाळांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

स्थानिक पातळीवरील कोरोनाची स्थिती अभ्यासूनच शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारी सरकारने स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांना दिला आहे. म्हणूनच तर मागील वर्षभरात ग्रामीण भागात मोजक्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या, तर मुंबई, पालघर, ठाणे, पुणे अशा अनेक ठिकाणी वर्षभर शाळा सुरू झालेल्या नाहीत. आम्ही सरसकट कुणावरही शाळा सुरू करण्याची जबरदस्ती केलेली नाही, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा- नवीन ऑक्सिजन प्लांट १७ ऑगस्टपासून होणार कार्यान्वित

 
पुढील बातमी
इतर बातम्या