घरबसल्या द्या ५ वी ते १२ ची परीक्षा, आलेय 'मुक्त विद्यालय'

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी राज्यात मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे, असे विद्यार्थी पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या मंडळातर्फे देऊ शकणार आहेत. नुकताच याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी सोयीनुसार आभ्यास करू शकणार आहेत. त्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमही यात असतील. हे मंडळ राज्य मंडळाचा भाग म्हणूनच कार्यरत असेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. 

ही वयोमर्यादा आवश्यक

शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार पाचव्या इयत्तेसाठी परीक्षा द्यायची असल्यास उमेदवाराचे वय किमान 10 वर्षे असणे आवश्यक आहे. आठव्या इयत्तेसाठी किमान 12 वर्षे वय आणि 10 वी साठी उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे तसेच 12 वीची परीक्षा देताना उमेदवाराचे वय किमान 16 वर्षे असणे गरजेचे आहे.

किमान अट

या मंडळात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला वयाचा दाखला द्यावा लागेल. किमान लेखन - वाचन कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. तसेच याआधी विद्यार्थी ज्या शाळेत गेला असेल, त्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल देणे अनिवार्य असेल. दहावी परीक्षेसाठी किमान दोन वर्षे महाराष्ट्रचा रहिवासी असण्याची अट आहे.

मुक्त विद्यालयाचा हेतू

  • शिक्षणापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे
  • शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे
  • शिकण्याची इच्छा असणाऱ्या वयस्कर व्यक्ती, गृहिणी, कामगारांना शिक्षणाची संधी
  • सोयीनुसार अभ्यासाची वेळ

शासनाच्या धोरणाला विरोधच

सन २००९ शिक्षण सक्तीचे अधिनियम कायद्यानुसार १४ वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. मुक्त विद्यालयाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शाळा बाह्य राहण्यास शासन प्रोत्साहन देत आहे. आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा शासनाचा विचार आहे. गरज नसताना विद्यार्थ्यांना सवलत मिळाल्यावर विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. शासनाने हे धोरण राबवू नये. नाहीतर शासनाविरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेऊ.

- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना


हे देखील वाचा -

११ वीचे १० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या