वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेची तयारी करा- अमित देशमुख

सध्या कोविड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरं असलं तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसंच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणं किंवा ऑनलाइन घेणं नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अमित देशमुख यांनी म्हटलं आहे की, राज्यात कोविड१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपर्यंत निर्बंध लागू आहेत. त्यामुळे २ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जूनपासून घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. कोविड१९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचं नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयानी केलं आहे.

हेही वाचा- राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० जूनपासून

असं असताना या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणं किंवा ऑनलाईन घेणं संयुक्तिक ठरत नाही. 

केंद्रीय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणं अनिवार्य ठरत आहे. एकंदरीत या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरं जाणं हिताचं ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावं परीक्षेसाठी त्यांना प्रेरित करावं, असं आवाहन अमित देशमुख यांनी केलं आहे.

मागच्या वर्षात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने परीक्षा यशस्वीरित्या घेतली असून त्या सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपूर्णत: कोविड१९ सुरक्षा कवच पुरवलं जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन निवेदनात त्यांनी केलं आहे.

(medical students must be prepare for exam which starts from 10th june in maharashtra says amit deshmukh)

हेही वाचा- दहावीच्या परीक्षेवर २ ते ३ दिवसांत निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुढील बातमी
इतर बातम्या