'लाॅ'च्या अॅडमिशनचा पत्ता नाही अन् विद्यापीठ म्हणतंय परीक्षा द्या!

असंख्य प्रकारचे घोळ घालून ठेवल्यानंतर मुंबई विद्यापीठाने विधी (लाॅ) विभागातील विद्यार्थ्यांना जणू नवा मनस्ताप देण्याचं ठरवलं आहे. विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाच विद्यापीठाने परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी तारीख जाहीर केली आहे. मात्र अजून प्रवेशच मिळालेला नसताना परीक्षेचा अर्ज कसा भरायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावू लागला आहे.

चौथी फेरी, आॅफलाईन प्रवेश बाकी

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून अद्याप चौथी फेरी आणि ऑफलाईन प्रवेश होणं बाकी आहे. अजून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाने पहिल्या सेमिस्टरसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर अशी तारीख जाहीर केली आहे. १६ तारेखनंतर अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून अॅडमिशन घेता येईल. त्यामुळे जिथं अॅडमिशनच झालं नाही, तिथं परीक्षा कशी देणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

विद्यापीठाने विधीच्या परीक्षा अर्जांच्या तारखा जाहीर करून नवीन घोळ घातला आहे. प्रवेश झाला नाही तर विद्यार्थी प्रवेश अर्ज कसा भरणार. त्यातच उशीरा अर्ज भरल्यास विद्यार्थ्याला भुर्दंडही द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रीया अपूर्ण असताना विद्यापीठ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख कशी जाहीर करू शकते? विद्यापीठाचा आपल्याच विभागाशी ताळमेळ राहिलेला नाही, असं दिसत आहे.

- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ काऊन्सिल

मला अजून विधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला नाही. आता ऑफलाईन प्रवेश सुरू केल्यानंतरच मला प्रवेश घेता येणार आहे. आजच मला परीक्षेच्या अर्जासाठी विद्यापीठाकडून तारीख जाहीर झाल्याचं कळलं. मात्र प्रवेशच झालेला नसताना परीक्षा कशी देणार? अर्ज कसा भरणार? असा प्रश्न मला पडला आहे. किमान विद्यापीठाने आमचे प्रवेश होईपर्यंत, तरी परीक्षा अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलावी.

- रिमा कदम, विद्यार्थीनी


हेही वाचा-

लॉच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा, एटीकेटी परीक्षा पुढे ढकलल्या

पेपरफुटी प्रकरण: 'त्या' विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पण कारवाई पोलीस अहवालानंतरच


पुढील बातमी
इतर बातम्या