अकरावीची शेवटची गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला

सध्या मुंबईसह, नवी मुंबई, पालघर, ठाणे याठिकाणी मिशन अकरावी अॅडमिशनला जोरात सुरुवात झाली असून ३१ जुलैला अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीत १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून फक्त ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. परंतु या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार असून याच दिवशी अकरावी प्रवेशप्रक्रियेची चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 

अकरावी मिशनला मध्येच ब्रेक

८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच १३ जूनपासून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील मिशन अकरावीच्या अॅडमिशनला सुरूवात करण्यात आली. १३ जून ते ३ जुलैपर्यंत विविध शाखांचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला. त्यानंतर लगेचच ५ जुलैला सकाळी ११ वाजता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलैपर्यंत कॉलेजात प्रवेश घेणं अनिवार्य होतं. दरम्यान, मुंबईसह इतरत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या हितासाठी दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदत वाढवून दिल्यामुळं अकरावी प्रवेश प्रक्रियेची जाहीर होणारी दुसरी यादी १३ जुलैऐवजी १६ जुलैला जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं.

अल्पसंख्याक महाविद्यालयांचा घोळ

मात्र त्यानंतर १६ जुलैला जाहीर होणारी यादी अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यावरून नागपूर उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे १९ जुलैला जाहीर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. १९ जुलैला ही दुसरी यादी जाहीर करण्यात आल्यानंतर २६ जुलै रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण अपेक्षित होतं. मात्र अल्पसंख्याक कॉलेजांमधील इनहाऊस कोट्यातील जागा अकरावी प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिल्यानंतर या जागा सामाविष्ट करण्यासाठी कॉलेजांना २७ जुलैपर्यंत व त्या जागांवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ ते २८ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला. आणि त्यानंतर मंगळवारी ३१ जुलैला तिसरी यादी जाहीर करण्यात आली.  

तीन वेळा बदल

आतापर्यंत अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत तीन वेळा बदल केल्यानंतर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या मंगळवारी ७ ऑगस्टला अकरावीची चौथी व शेवटची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून ७ ते ९ ऑगस्टपर्यंत यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

काॅलेज सुरू करण्याची परवानगी

तसंच आतापर्यंत ज्या कॉलेजांचे प्रवेश ७० टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना कॉलेज सुरू करण्यास शिक्षण संचालकांनी काहीच हरकत नाही, असं सांगितलं असून त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा तास घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशी सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयानं केली आहे.


हेही वाचा -

सेंट झेवियर्सला मिळाले मराठमोळे प्राचार्य

शाळेतून 'छडी' होणार हद्दपार!


पुढील बातमी
इतर बातम्या