‘आयडॉल’ला हवाय प्रभावी संचालक

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नवीन अभ्यासक्रमांचा अभाव, पूर्णवेळ संचालक नसणे, सतत रोडावत असलेली विद्यार्थीसंख्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी)कडून देण्यात येणाऱ्या मानांकना (नॅक)त समावेश न होणे ‘आयडाॅल’साठी धोक्याची घंटा ठरु शकते. यामुळे आयडाॅलसाठी प्रभावी संचालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होऊ लागली आहे. 

समस्यांची जंत्री

  • ‘आयडाॅल’चा दर्जा घसरत असतानाही मुंबई विद्यापीठाचं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष हाेताना दिसत आहे. त्यामुळे ‘आयडाॅल’ बंद करणे हा तर मुंबई विद्यापीठाचा हेतू नाही ना? असा प्रश्न ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सिनेटच्या बैठकीत युवासेनेचे सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी उपस्थित केला होता. थोरात यांनी स्थगन प्रस्ताव मांडत ‘आयडाॅल’मधील अनेक मुद्द्यांना हात देखील घातला.
  • ‘आयडाॅल’च्या ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी ‘आयडाॅल’ अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. २ वर्षांपूर्वी ‘आयडाॅल’द्वारे विविध अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८१ हजार एवढी होती. परंतु ही विद्यार्थी संख्या कमालिची घसरून सद्यस्थितीत ६७ हजारांवर आली आहे.
  • यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवीन वातावरणाला पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमांचा अभाव. विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने २००५ पासून ‘आयडाॅल’ मध्ये एकही नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला नाही.
  • ‘आयडाॅल’मध्ये एम.बी.ए., पत्रकारीता, लॉ, उद्यान विद्या, एम.ए.मानसशास्त्र, असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मागील दीड वर्षांपासून मागणी करत असल्याची माहिती अॅड. थोरात यांनी दिली.  इतर मुक्त विद्यापीठ व संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू असताना मुंबई विद्यापीठ हे अभ्यासक्रम सुरू का करत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
  • परीक्षा विभागातील सावळा गोंधळ अजूनही दूर झालेला नाही. निकाल वेळेत न लागणे, निकालपत्र वेळेत न मिळणे तसंच परीक्षा भवनमधील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना होणारा त्रास नेहमीचाच झाला आहे. पूर्नमुल्यांकनाचे निकाल बऱ्याचवेळा केटीचे पेपर्स
  • झाल्यानंतर लागत असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
  • युजीसीच्या नियमावलीनुसार प्रत्येक अभ्यासक्रमासाठी तीन पूर्णवेळ प्राध्यापक असणं आवश्यक असताना ‘आयडाॅल’मध्ये सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून फक्त ६  पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. 
  • 'यूजीसी'ने ऑगस्ट २०१८मध्ये देशातील मान्यताप्राप्त दूर व मुक्त शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली होती. यात मुंबई विद्यापीठातील 'आयडॉल'सह राज्यातील ३४ संस्थांची नावे नव्हती. तेव्हापासून सातत्याने जारी करण्यात येत असलेल्या यादीतून  'आयडॉल' गायब असल्याचंच दिसून येत आहे. त्यामुळे २०२० मध्ये ‘आयडाॅल’ला नॅक मानांकन मिळालं नाही, तर पुन्हा आयडॉलला मान्यता गमवावी लागू शकते.

२२ महिन्यांपासून विद्यापीठाकडे नॅक नसून विद्यापीठ प्रशासनावर  नॅक बरोबर नाक पण, शाबुत ठेवण्यासाठी वेळ आलेली आहे.

- अॅड. वैभव थोरात 


हेही वाचा- 

यूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती

एमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या