ऑनलाइन शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांवर अर्थिक संकट ओढावलं आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी यंदा ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले. शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्याशिवाय, २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन क्लासेस घेण्याबाबत मुंबई विद्यापीठानं मार्गदर्शक तत्वं जाहीर केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा निकाल उशिरानं लागल्यामुळं २०२०-२१ शैक्षणिक वर्षाल उशिरा सुरूवात झाली. परंतु, ऑनलाइन शिक्षणावेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठाद्वारे शिक्षकांना प्रत्येक विषय ४ टप्प्यात विभागण्यास सांगितलं आहे. त्यानुसार, व्हिडिओ लेक्चर, वाचन, चाचण्या आणि प्रश्न-कोडींद्वारे आत्म-मूल्यांकन चाचण्या तसंच, विद्यार्थ्यांच्या शंका दुर करण्यासाठी ऑनलाईन चर्चा मंच उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे.

मुंबई विद्यापीठाद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असंही नमुद करण्यात आलं आहे की, एखादा विद्यार्थ्याला ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होण्यास अडथळे निर्माण होत असतील तर, हे लेक्चर फेसबुक अथवा युट्यूबवर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून संबंधित विद्यार्थ्याला सहज त्या विषयाचा अभ्यास करता येईल.

याआधी २ ऑगस्टरोजी मुंबई विद्यापीठाद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात प्रथम वर्षाच्या पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम वगळता महाविद्यालयांनी केवळ नवीन शैक्षणिक वर्षासाठी ई-शिक्षण सुरू करावे असे नमुद करण्यात आलं होतं. मात्र, या निर्णयावर अनेक शिक्षकांनी टीका केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 


हेही वाचा -

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या