निकाल गोंधळ पूर्णपणे निस्तरणं हे पहिलं ध्येय - कुलगुरू

"कुलगुरूपदाचा पदभार स्विकारल्यानंतर विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा वेळेवर घेणं, तसेच त्यांचे पेपर वेळेत चेक करून निकाल वेळेत लावणं हे माझं सर्वात पहिलं ध्येय असणार आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी निवड झाल्यानंतर दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी २७ एप्रिलला नियुक्ती पत्र देऊन डॉ. सुहास पेडणेकर यांची नवीन कुलगुरू म्हणून निवड केली आहे. त्यानंतर नव्या कुलगुरूंनी त्यांच्यासमोरील आव्हानं आणि विद्यापीठासाठी त्यांच्या विविध उपाययोजना यावर 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश...

कुलगुरू पदाचं काम फक्त परीक्षा घेणं नाही...

माझी कुलगुरूपदी निवड झाल्याने मी खूप आनंदी आहे. तसेच मी लगेचच कामाला सुरूवात करणार असून कुलगुरूंचं काम हे फक्त कॉलेज किंवा विद्यापीठाच्या परीक्षा घेणं एवढंच नाही. तसेच विद्यापीठात आतापर्यंत झालेला निकाल गोंधळ निस्तरून विद्यापीठ सांभाळणे हे माझ्यापुढे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

निकाल वेळेत लावणं हे माझं ध्येय...

कुलगुरूपदाचा पदभार स्विकारल्यानंतर विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा वेळेवर घेणं, तसेच त्यांचे पेपर वेळेत चेक करून निकाल वेळेत लावणं हे माझं सर्वात पहिलं ध्येय असणार आहे. तसंच आतापर्यंतच्या कुलगुरुंनी केलेलं कार्य व अनुभवातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, तसेच आतापर्यंत झालेले सर्व गोंधळ लवकरच मिटतील असा माझा ठाम विश्वास आहे.

मुंबई विद्यापीठाला मोठी परंपरा...

मुंबई विद्यापीठाला एक मोठी परंपरा आहे. त्यामुळे सर्व लोकांना सोबत घेऊन मला काम करायचं आहे. यासाठी शिपायापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच स्तरावर संवादाचे एक माध्यम उपलब्ध करुन द्यायला हवे.

'नॅक'ची रँक सुधारणे...

मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल रँकिंगमध्ये झालेली घसरण लवकरात लवकर सुधारणे हे देखील माझे उद्दिष्ट असणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने विविध प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्यात सुधारणा होईल.

सर्वांनी मतभेद बाजूला ठेवावेत...

‘गेल्या अनेक दिवसांपासून कुलगुरुपद रिक्त होतं. मला वाटतं की, सर्वचजण कुलगुरूपदाच्या नियुक्तीची वाट पाहत होते की, कुणीतरी चार्ज घ्यावा. ज्याला विद्यापीठाची माहिती आहे अशा व्यक्तीची नेमणूक व्हावी. त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन विद्यापीठाची परंपरा पुढे नेण्यासाठी काम करावं, असं मी आवाहन करतो.


हेही वाचा

जाणून घ्या, कोण आहेत डॉ. सुहास पेडणेकर?

पुढील बातमी
इतर बातम्या