विद्यापिठातील सुरक्षा रक्षक वाऱ्यावर; बुक्‍टू संघटना करणार उपोषण

गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत अाहे. अत्यल्प वेतन, सुविधांचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सुरक्षा रक्षक त्रासले आहेत. दिवस-रात्र विद्यापीठाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्‍नांसाठी प्राध्यापकांची बुक्‍टू संघटना येत्या २ नोव्हेंबर रोजी फोर्ट कॅम्पसमध्ये एक दिवसीय उपोषण करणार आहे.  

अवघे ९ हजार वेतन

गेल्या २० वर्षांपासून मुंबई विद्यापीठात रोजंदारीवर काम करणारे अनेक सुरक्षा रक्षक आहेत. यापैकी १४५  सुरक्षा रक्षकांना फक्त ९ हजार ६०० रुपये मानधन देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे खासगी संस्थेमार्फत नियुक्त केलेल्या ६० सुरक्षा रक्षकांना महिन्याला २१ हजार रुपये पगार मिळत आहे. त्याशिवाय त्यांना आवश्‍यक असलेला गणवेशही स्वतः खरेदी करावा लागत आहे. 

गणवेश बदलण्यासाठी शौचालय

इतकंच नव्हे तर, महिला सुरक्षा रक्षकांना गणवेश बदलण्यासाठी कॅम्पसमध्ये एकही खोली नसल्यानं त्यांना नाईलाज म्हणून शौचालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याशिवाय कलिना कॅम्पसमधील तीनही प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौक्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. मात्र त्याकडं सर्व विद्यापीठ अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा सुरक्षा रक्षकांनी केला आहे. 

सुरक्षा रक्षक संतप्त

विद्यापीठात सुरु असणाऱ्या या कारभाराविरोधात सुरक्षा रक्षक संताप व्यक्त करत आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अखेर प्राध्यापकांच्या बुक्‍टो संघटनेने आवाज उठवण्याचं ठरवलं आहे. यानुसार येत्या शुक्रवारी २ नोव्हेंबरला फोर्ट कॅम्पसमध्ये उपोषण करण्यात येणार आहे. 

१९९६ सालापासून हे सुरक्षा रक्षक विद्यापीठाची सेवा करत असून विद्यापीठ त्यांना अत्यल्प वेतन देत आहे. त्याशिवाय अनेकदा त्यांना सार्वजनिक सुट्ट्याही मिळत नाही. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांना खासगी सुरक्षा रक्षकांप्रमाणे वेतन दिले जावे, यासाठी बुक्‍टू संघटना पाठपुरावा करत आहे. परंतु याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं अखेर २ नोव्हेंबरला फोर्ट कॅम्पसमध्ये एक दिवसीय उपोषण करण्याचं ठरवलं आहे. त्याशिवाय सुरक्षा रक्षकांचा प्रश्‍न विद्यापीठान सोडवला नाही, तर विद्यापीठात आमरण उपोषण केलं जाईल, असा इशाराही संघटनेनं दिला आहे. 

- मधु परांजपे, सरचिटणीस, बुक्‍टू संघटना


हेही वाचा - 

तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोका, मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

आशियातील क्रमवारीत आयआयटीची 33 व्या स्थानावर झेप


पुढील बातमी
इतर बातम्या