आता मुलांची पुस्तकं पीडीएफ स्वरूपात मोबाईलवरही!

पहिलीपासून ते दहावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात पुस्तकांचे फार महत्त्व असते. वर्षाच्या सुरुवातीला विकत घेतलेली पुस्तके तशाच प्रकारे शेवटपर्यंत टिकतील असं काही सांगता येत नाही. पुस्तकांची निगा राखणे, त्यांना जपणे हे प्रत्येक विद्यार्थी व पालकांवर अवलंबून असते. परंतु कित्येक वेळा काळजी घेऊनही पुस्तके फाटतात, हरवतात, कधी कधी ती सापडतही नाहीत. तर कधी आपण एखाद्या ठिकाणी ती विसरून येतो. मग अशा वेळी मुलांसह पालकांचीही तारांबळ उडते.

पुस्तकं वापरणं होणार सोपं

मुलांची तसेच पालकांच्या शिक्षणाची वाट थोडीशी सुकर करण्याच्या हेतूने बालभारतीद्वारे एक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात पुस्तके प्राप्त होणार आहे. विशेष बाब म्हणजे यात मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू, गुजराती, सिंधी यांसारख्या इतर भाषांच्या पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे.

अशी शोधा पुस्तकं

सर्वप्रथम ई-बालभारतीच्या http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या वेबसाईट वर जा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या इयत्तेचे व कोणत्या माध्यमाचे पुस्तक हवे आहे तिथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवे असलेले पुस्तक डाऊनलोड करा.

पालकांसह विद्यार्थ्यांनाही फायदा

सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने सर्वच गोष्टी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकही स्मार्टफोन वापरत असल्याने तेही पुस्तकं डाऊनलोड करून त्यातून मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. बालभारतीच्या या उपक्रमामुळे पालकांना दिलासा मिळाला असून अभ्यासू विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे.


हेही वाचा

स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहानी आता १० वीच्या पुस्तकात

पुढील बातमी
इतर बातम्या