सिग्नल शाळा...इथे उद्याचा भारत घडतो!

  • मानसी बेंडके & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

रस्त्यावरच्या बसवर असलेल्या पोस्टरवरुन तिची बोटं फिरत होती...काय होतं तिथे याची मला उत्सुकता लागली..माझी रिक्षा तिच्या समोर आल्यावर मला कळलं की ती बोटं पोस्टरवरच्या इंग्रजी अक्षरांवरुन फिरत होती...'अरे ए काम करना, ये क्या कर रही है?'...बाजूने आलेल्या आवाजाने तिची तंद्री तुटली आणि ती माझ्यासमोर येऊन ओरडली..'लेलो 10 का गजरा लेलो'...मी विचारलं 'स्कूल में पढते हो?'..त्यावर ती माझ्याकडे हसतच निघून गेली..तिचं ते हसणं माझ्या प्रश्नावर होतं की स्वत:च्या नशीबावर? तिलाच ठाऊक..

पोटापाण्यासाठी म्हणा किंवा दुष्काळाला कंटाळून म्हणा, खेड्या-पाड्यातून माणसांचे लोंढे मुंबईच्या दिशेने येतात. अंगावरचे कपडे आणि सोबतीला एक-दोन गाठोडे हीच काय ती त्यांची संपत्ती. मुंबईत सिग्नल, फ्लायओव्हर किंवा फुटपाथवरच कसेबसे आयुष्य काढायचे. पोटापाण्यासाठी सिग्नलवर भिक मागणे, लहानमोठ्या वस्तू किंवा खेळणी विकणे, अशी कामं त्यांच्या मुलांच्या नशीबी येतात. 'राईट टू एज्युकेशन'चा कायदा आहे मात्र याचा फायदा मात्र सर्वच स्तरावरच्या मुलांना झालाच असं नाही. आणि यासाठीच ठाणे महानगर पालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने पुढाकार घेतला..काय केलं त्यांनी?

ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सिग्नलवर फिरणाऱ्या मुलांसाठी त्यांनी खास 'सिग्नल शाळा' भरवली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच ही मुलं शाळा, अभ्यास, गाणी आणि गोष्टी असे बरेच काही अनुभवत आहेत! विशेष म्हणजे मालवाहू कंटेनरच्या तात्पुरत्या वर्गखोल्यांमध्ये यांची ही अजब शाळा भरते! पण इतकं असूनही या मुलांची शिकण्याची जिद्द आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.

तीन हात नाक्यावर भिक मागणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लहान मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे हे सिग्नल शाळेचे उद्दिष्ट आहे. सध्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. इतर सिग्नलवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी आणखी एक कंटेनर मागवण्यात आला आहे. लवकरच या कंटेनरमध्ये देखील शाळा भरवण्यात येईल. शिवाय दुसऱ्या सिग्नलवरून येणाऱ्या मुलांसाठी ऑक्टोबरमध्ये बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

- भटू सावंत, संचालक, सिग्नल स्कूल

उंदीर चावल्याचा मुलांना त्रास

शाळेशी संबंध नसल्याने सुरुवातीला मुलांना खेळ आणि गाणी यात गुंतवण्यात आलं. हळूहळू लक्षात आलं की, खेळता खेळता, गाणी ऐकता ऐकता मुलं झोपतात. कदाचित झोप पूर्ण होत नसेल, म्हणून झोपत असतील असं सुरुवातीला त्यांना वाटलं. पण हे प्रकरण जरा वेगळं होतं. सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रस्त्याकडेलाच राहणं, झोपणं यामुळे कित्येक मुलांना उंदीर चावले होते. त्यात स्वच्छतेचा अभाव तर होताच. मुलं आंघोळच करायची नाहीत. त्यामुळे मुलांना त्वचारोग झाला होता. अरबट-चरबट खाण्यामुळे मुलांना पोटाचे विकार झाले होते. त्यामुळे शिक्षणापूर्वी या मुलांचं आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आंघोळीपासून जेवणापर्यंतची सर्व सोय शाळेत करण्यात आली. मुलांना ठाणे पालिकेतर्फे शाळेचे गणवेश देण्यात आले. मुलांना सामान ठेवण्यासाठी लॉकर देण्यात आले.

शिक्षकांनीही घेतला शिक्षणाचा वसा!

या शाळेत मुलांना सर्व विषय शिकवले जातात. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान ते अगदी सध्याच्या युगात आवश्यक असणारा कम्प्युटरदेखील शिकवण्यात येतो. मुलांना शिकवायला काही शिक्षक बाहेरून येतात. स्वच्छतेपासून ते मुलींच्या पाळीच्या समस्यांसंदर्भात देखील शिकवले जाते. कॉलेजचे विद्यार्थी देखील वेळात वेळ काढून या मुलांना शिकवायला येतात.

या मुलांची मातृभाषा वेगळी असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आधी आम्ही त्यांची भाषा आत्मसात केली. शैक्षणिक विषयांसोबतच मुलांना क्राफ्ट, चित्रकला, संस्कारवर्ग, क्रिडा असे विषय देखील शिकवले जातात. एकाग्रता वाढावी म्हणून या मुलांचे योगा क्लासेसही घेतले जातात.

आरती परब, शिक्षिका

मुले पुस्तकात रमतात तेव्हा...

शाळेतल्या गंमती-जमती पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने मुलांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे. या मुलांपैकी कुणाला डॉक्टर व्हायचे आहे, कुणाला लष्करात भरती व्हायचे आहे, तर कुणाला शिक्षक व्हायचे आहे. प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न आहे. ही मुलं सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत शिक्षणाचे धडे गिरवतात. दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाष्टा या मुलांना दिला जातो. आता ही मुलं शाळेत रमू लागली आहेत. हळूहळू का होईना, मुलांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे.

समाजातल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाचा उद्धार करणे हे समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे धोरण आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच शिक्षणाच्या मदतीने त्यांच्यातील कौशल्याचा विकास करणेही महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल. शिवाय यामुळे ते गुन्हेगारी मार्गाकडे वळणार नाहीत. त्यामुळे सिग्नल शाळा ही एक गरज आहे.

- उल्हास कारले, संचालक, समर्थ भारत व्यासपीठ

मुलांनी असेच शिकत राहावे आणि चांगले आयुष्य जगावे हीच या मुलांच्या पालकांची अपेक्षा आहे. मुले शिकत असल्याने त्यांचे आई-वडील समाधानी आहेत. ज्यांना शिक्षणाची आवड आहे, पण परिस्थितीमुळे शिकता येत नाही, अशा सिग्नलवरच्या मुलांसाठी ही शाळा नक्कीच उमेदीचा किरण आहे!


हेही वाचा

ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या