११ वीचे १० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनसुद्धा १० हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला नाही. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज नाकारले आहे. याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार असून अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. प्रवेश न घेतल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर फेकले गेलेत. चारही फेऱ्या झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजमधील प्रवेशाचे स्वप्न भंगणार आहे.

दुसऱ्या फेरीतील स्पर्धा तीव्र

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १४ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवण्यात आली होती. त्यानुसार ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तर ७६ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आवडत्या कॉलेजचे स्वप्न भंगणार

७६ हजार विद्यार्थ्यांमध्ये पहिला पसंतीक्रम दिलेल्या १० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता दुसऱ्या फेरीसाठी स्पर्धा आणखीनच वाढली आहे. ७६ हजार विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक ४८ हजार ५२४ विद्यार्थी कॉमर्स शाखेतील आहेत. २० हजार ६६२ विद्यार्थी सायन्स शाखेतील आहेत. तर आर्ट्सच्या ६ हजार ८४६ विद्यार्थ्यांचा यांत समावेश आहे.

पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनसुद्धा हजारो विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला नाही. त्याचा फटका इतर विद्यार्थ्यांना बसणार आहे. दुसऱ्या फेरीवर त्याचे पडसाद उमटणार आहेत. आता प्रवेशाच्या चारही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

- बी.बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक

शुक्रवारी पहिली फेरी पूर्ण झाली असून आता १७ जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे.


हे देखील वाचा -

विद्यार्थ्यांना मिळणार आता डिजिटल प्रमाणपत्र


 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या