पेपरफुटी प्रकरण: 'त्या' विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पण कारवाई पोलीस अहवालानंतरच

एव्हीएम महाविद्यालयात बीएमएस पदवी परीक्षेच्या दुसऱ्या सत्रातील पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात ७ आरोपी विद्यार्थ्यांनी सोमवारी परीक्षा दिली. अटकेतील एकूण १३ जणांपैकी ७ विद्यार्थी संशयीत असल्याने मुंबई विद्यापीठाने त्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी दिली. मात्र याप्रकरणी जोपर्यंत पोलिसांचा चौकशी अहवाल सादर होत नाही व विद्यार्थ्यांची पेपरफुटीतील भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे.

जामीन मिळाला

अंधेरी पश्चिमेकडील एमव्हीएम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात बीएमएसच्या दुसऱ्या सत्रातील पेपर फुटल्याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. यापैकी ७ विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी ११ ते १.३० या वेळेत परीक्षेला उपस्थित राहण्याची परवानगी मुंबई विद्यापीठाने दिली. परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना अंधेरीतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात नेण्यात आलं. तिथं कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला.

चौकशी समितीचा अहवाल

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने तात्काळ एक समिती नेमली. या समितीच्या सदस्यांनी एमव्हीएम महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांची भेट घेत त्यांचा जबाब नोंदवून घेत अहवाल तयार केला.

काय कारवाई होईल?

या समितीने विद्यापीठाला सादर केलेला अहवाल सध्या गुलदस्त्यात असून पोलिसांचा अहवाल मिळाल्यावर या ७ विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा की नाही, त्यांच्यावर काय कारवाई करायची? हे निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.

फेरपरीक्षेवर अद्याप निर्णय नाही

पेपर फुटलेल्या अभ्यासक्रमांची फेरपरीक्षा घ्यायची की नाही? याबाबत अद्याप निर्णय न झाल्याचं विद्यपीठाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या २ दिवसांत पोलिसांकडून अहवाल आल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असं प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या