विधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्यात दिवाळीपूर्वीच निवडणुका होणार असल्यानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या परीक्षा लांबणार आहे. तसंच, यंदा प्रवेश प्रक्रिया रखडल्यानं या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रातील परीक्षांचं नियोजन कोलमडलं आहे. अशातच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळं सत्र परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार आहेत.

शाळांचं नियोजन

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचं शाळांचं नियोजन होतं. परंतु, राज्यात विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल आणि नंतर २५ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे शाळांना १९ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा संपवाव्या लागणार आहेत.

कमी शिक्षक उपस्थित

या सत्रातील सुट्ट्या, लांबलेली प्रवेश प्रक्रिया यामुळं अध्यापनासाठी शाळा, महाविद्यालयांना कमी दिवस मिळाले आहेत. त्यामुळं १९ ऑक्टोबरपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा पूर्ण करणं शाळांना शक्य नाही. तसंच, निवडणुकीचं काम, प्रशिक्षणं यामुळं शाळांमध्ये कमी शिक्षक उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. 

पुढील सत्राला विलंब

विधानसभा निवडणुक आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास त्याचे निकाल जाहीर करून पुढील सत्र सुरू होण्यासाठी विलंब होईल. मात्र, असं असलं तरी पुढील शैक्षणिक वर्षांचं वेळापत्रक, विविध प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक यांमुळं पुढील सत्राच्या परीक्षा मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळं दुसऱ्या सत्रातील परीक्षेदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांवर ताण पडण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा -

चिल्लर हवी आहे, या बस आगारात; बेस्टची नवी क्लपना

'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात


पुढील बातमी
इतर बातम्या