स्वप्निल राजशेखरचा नवा अवतार !

कधी नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारे स्वप्निल राजशेखरमाझा एल्गार’ या आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एका नव्या रूपात दिसणार आहेत. वरवर जनतेच्या हिताची कामं करणारा महंत समाजातील भोळ्या भाबड्या व्यक्तींचा फायदा कसा उचलतो, हे दाखवणारा खलनायक स्वप्निल यांनी या सिनेमात वठवला आहे.   

भूमिकेला न्याय देणारा कलाकार

गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणं, आध्यात्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजी करणं हा महंत महाराजचा खरा धंदा असतो. या व्यक्तिरेखेला स्वप्निल राजशेखर योग्य न्याय देऊ शकेल असं वाटलं आणि त्यांनी होकार दिल्याने मनाजोगत्या कलाकारासोबत काम करण्याचं समाधान लाभल्याचं दिग्दर्शक मिलिंद कांबळे सांगतात. 

'असा' आहे गेटअप

या भूमिकेसाठी स्वप्निल यांनी वेगळा गेटअप केला आहे. पांढरा पोषाख, कमरेला उपरणं, लांब केस, कपाळावर सूर्यरूपी कुंकू, गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, हाती जपमाळा अशा अवतारात स्वप्निल या चित्रपटात दिसणार आहे. वाचिक अभिनयासोबतच नेत्रअभिनयाद्वारे स्वप्निलने या व्यक्तिरेखेत गहिरे खलनायकी रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐश्वर्या राजेश, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी यांसारख्या अनेक कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच ‘माझा एल्गार’ चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

आता प्रतीक्षा 'मुंबई पुणे मुंबई ३'ची!


पुढील बातमी
इतर बातम्या