Advertisement

आता प्रतीक्षा 'मुंबई पुणे मुंबई ३'ची!


आता प्रतीक्षा 'मुंबई पुणे मुंबई ३'ची!
SHARES

काही सिनेमे असे असतात जे कितीही जुने झाले, तरीही प्रेक्षकांच्या मनातून जात नाहीत, ते सतत आठवणीत जिवंत असतात. त्यातलाच एक मराठी सिनेमा म्हणजे 'मुंबई पुणे मुबई'. या सिनेमाला प्रेक्षकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं, कि त्यानंतर दिग्दर्शकाने त्या सिनेमाचा दुसरा भाग 'मुंबई पुणे मुंबई २ लग्नाला यायचंच' प्रेक्षकांसमोर आणला. या दोन्ही सिनेमाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई - ३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात एखाद्या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

५ वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रीमेक’ झाले, तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढचा भाग बनवावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती.



२ वर्षांपूर्वी दिवाळीच्याच मुहूर्तावर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-2 लग्नाला यायचंच’चं मोठ्या धूमधडाक्यात रसिकांकडून स्वागत झालं. चित्रपटाला महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकेतूनही प्रचंड प्रतिसाद लाभला होता.



दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा एक हटके चित्रपट म्हणूनही एक वेगळी ओळख या चित्रपटाला आहे. राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-2 लग्नाला यायचंच’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांप्रमाणेच या चित्रपटातही अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे दोन लोकप्रिय चेहरे प्रमुख भूमिकेत दिसतील. २०१८ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

आर्चीचा दुसरा मराठी चित्रपट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा