अभिनेत्री दिपाली सय्यदने धरली ‘शिव संग्राम’ची वाट

बऱ्याच कलाकारांची पावलं अभिनय करता करता राजकारणाकडे वळतात. त्यापैकी काहीजण हौसेखातर राजकारणात प्रवेश करून अल्पावधीतच पुन्हा आपल्या मूळ कामाकडे परततात, पण काही कलाकार मात्र समाजसेवेचं व्रत जपत राजकारणातील वाटचाल सुरूच ठेवतात. मागच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) तिकिटावर निवडणूक लढवणारी अभिनेत्री दिपाली सय्यद हिनेही एक पाऊल पुढे टाकत ‘शिव संग्राम’ पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करत दिपालीने आपले विचार व्यक्त केले.

कोणत्याही पक्षात नव्हते

मागच्या वेळी मी अहमदनगरमधून आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्या दरम्यान राजकारण काय असतं ते जवळून पाहता आलं. राजकारणाच्या माध्यमातून मला समाजसेवा करायची होती. त्यामुळेच निवडणूकीनंतरही माझं काम सुरूच ठेवलं. आपमध्ये केवळ निवडणूकीपुरतीच होते.

निवडणुकीनंतरही समाजकार्य सुरूच

निवडणूकीच्या काळात तिथल्या नागरिकांनी मला जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी मी धडपडत होते. त्यांच्यासाठी काहीतरी ठोस करण्याची तळमळ होती. यातूनच एक कल्पना सुचली त्यावर मागील वर्षभरापासून काम सुरू आहे. निवडणूकीदरम्यान आणि नंतरही तिथल्या स्थानिक लोकांनी मला खूप सहकार्य केलं. त्यामुळेच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत झाली.

वृद्धाश्रमाच्या कामात बिझी

स्थानिकांच्या मदतीने अहमदनगरमधील गुंडे गावात मी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू करत आहे. मागील वर्षभरापासून त्यातच बिझी आहे. राजकारण गलिच्छ असल्याचं सर्वच म्हणतात, पण तिथे राहूनही चांगलं काम करता येऊ शकतं असं मी मानते.

‘शिव संग्राम’च का?

हे काम सुरू असतानाच ‘शिव संग्राम’चे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटेसाहेबांची भेट झाली. त्यांचे विचार पटले. ‘शिव संग्राम’च्या माध्यमातून आपलं काम सुरू ठेवल्यास समाजाची सेवा करण्याच्या माझ्या प्रवासाला नवी दिशा मिळेल. त्यांचा अजेंडा क्लिअर आहे. सर्वसामान्य जनतेसाठी करण्याची तळमळ त्यांच्याकडे असल्याची जाणीव झाली. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षापेक्षा ‘शिव संग्राम’सारख्या छोट्या पक्षात राहून जनतेची सेवा करणं सोपं वाटल्याने या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कधी होणार पक्षप्रवेश?

मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी पुण्यातील विजय तेंडुलकर नाट्यगृहामध्ये भारतीय संग्राम परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात मेटेसाहेबांच्या उपस्थितीत मी आणि बरेच कार्यकर्ते ‘शिव संग्राम’मध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहोत. भारती लव्हेकरांसारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रभावित होणं हे देखील ‘शिव संग्राम’ची वाट धरण्यामागील एक कारण आहे.

जबाबदारीत वाढ

‘शिव संग्राम’मध्ये महिला अध्यक्ष या पदावर माझी नियुक्ती करण्यात येणार आहे. पद फार मोठं असल्यामुळे जबाबदारीही वाढली आहे. जबाबदारीचं भान आणि वास्तवाची जाण ठेवत पुढील वाटचाल करायची आहे. या प्रवासात ‘शिव संग्राम’च्या कार्यकर्त्यांसोबतच माझ्या अभिनयाचे चाहतेही साथ देतील याची खात्री आहे.

अभिनय करणारच

राजकारणात सक्रिय राहिले तरी अभिनयापासून दूर जाणार नाही. अभिनय आणि नृत्य हा माझा श्वास आहे. सध्या ‘दम दमा दम २’ची परीक्षक म्हणून काम पाहते आहे. याखेरीज लवकरच माझा ‘रंगात’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याशिवाय इतरही काही सिनेमांची बोलणी सुरू आहेत.


हेही वाचा -

दिपाली सय्यदचा अनाथांना हात!

पुढील बातमी
इतर बातम्या