Advertisement

दिपाली सय्यदचा अनाथांना हात!

‘आम अादमी पक्षा’ च्या तिकिटावर अहमदनगरमधून निवडणूक लढवताना दिपालीला तिथल्या दाहक वास्तवतेची जाणीव झाली. उद्विग्न झालेल्या दिपालीच्या मनात समाजसेवेचं बीज पेरलं गेलं आणि वृद्धाश्रम व अनाथाश्रमाची संकल्पना पुढे आली.

दिपाली सय्यदचा अनाथांना हात!
SHARES

उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका म्हणून सर्वांच्याच परिचयाची असलेली दिपाली भोसले-सय्यद वृद्धांच्या मदतीसाठी धावून आली आहे. वृद्ध आणि अनाथांसाठी ती आश्रम सुरू करत आहे. यातून तिनं अापल्यातील माणुसकी अाणि संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. वर्तमान काळात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत करताना दिपालीने आपल्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक कार्याचा उलगडा केला.

दिपाली सध्या चंदेरी दुनियेपासून दूर जात एका वेगळ्याच कामात व्यग्र आहे. बरेच कलाकार अनाथ आणि वृद्धांबाबत भाषणं देतात. पण त्यातील हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्यांच्या मदतीला धावतात. अशा कलाकारांच्या यादीत आता दिपालीचं नावही जोडलं गेलं आहे. वृद्ध् आणि अनाथ मुलांकरीता आश्रम सुरू करण्यासाठी सध्या दिपालीची धडपड सुरू आहे.


राजकारणातून समाजसेवाचा वसा

राजकारण गलिच्छ असतं असं सर्वजण म्हणतात. पण हेच राजकारण काहींना समाजाच्या सेवेची गोडीही लावू शकतं याचं आणखी एक उदाहरण म्हणजे दिपाली. ‘आम अादमी पक्षा’ च्या तिकिटावर अहमदनगरमधून निवडणूक लढवताना दिपालीला तिथल्या दाहक वास्तवतेची जाणीव झाली. उद्विग्न झालेल्या दिपालीच्या मनाने मग तिथल्याच जनतेसाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. इथंच दिपालीच्या मनात समाजसेवेचं बीज पेरलं गेलं आणि वृद्धाश्रम व अनाथाश्रमाची संकल्पना पुढे आली.


नगरमधील गुंडेगावात आश्रम

दिपालीचा आश्रम अहमदनगरमधील गुंडे गावात उभा राहणार आहे. यासाठी सहा महिन्यांपूर्वी गुंडेगावातील अडीच एकर जमिनीवर भूमीपूजन करण्यात आलं. आर्किटेक्ट येऊन जमिनीची पाहणी आणि मोजणी करून गेले आहेत. किती जागेत बांधकाम करायचं त्याचं डिझाइन त्यांनी तयार केलं आहे. तीन महिन्यांनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. त्यानंतर वर्षभरात आश्रमाचं काम पूर्ण करण्याची योजना आहे.गुंडेगावच का?

या प्रश्नाचं उत्तर देताना दिपाली म्हणाली की, गुंडेगावातील लोकांनी मला आपलं मानलं, जागा दिली. त्या जागेचा सदुपयोग कसा करायचा? हा प्रश्न पडला. तिथल्या लोकांसाठीच काहीतरी करावं या भावनेतून हा आश्रम उभाणार आहे. अहमदनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर आणि शिर्डीहून शनी शिंगणापूरला जाताना राहुरीच्या पुढे गुंडेगाव आहे.


दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशन

दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशन अंतर्गत आश्रमाचं काम सुरू करण्यात येणार असून, आश्रमालाही तेच नाव देण्यात येणार आहे. यासाठी स्वत:हून पुढाकार घेत काहींनी दिपालीला साथ दिली आहे. भाऊसाहेब शिंदे, शिरीष भोसले (भाऊ), शशिकांत शिंदे (भावोजी), कपिल मर्चंट (आर्किटेक्ट), विमल पटेल, प्रभाकर म्हात्रे, अमरावतीच्या अायुक्तांच्या पत्नी मिसेस मांडलीकर, लायन्स क्लब अादींनी या कामात दिपालीला मदतीचा हात पुढे केला आहे.


नकळत घडत गेलं

हे कार्य आपण करत नसून, करवून घेतलं जातंय असं दिपालीला वाटतं. दिपाली म्हणाली की, मी निवडणुकीलाही उभी राहणार नव्हते. पण तिथल्या लोकांनी आग्रह धरल्याने निवडणूक लढवली. प्रथमच राजकारण जवळून पाहिलं. यादरम्यान भाऊसाहेब शिंदे नावाच्या तिथल्या समाजसेवकाशी ओळख झाली. त्यांनी अडीच एकर जमिनीवर समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस व्यक्त केला. तिथंच माझ्या डोक्यात या जमिनीवर वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम करण्याची योजना आली. हे सारं नकळत घडत गेलं.


काहीतरी चांगलं करायचंय

आजवर कलाकार म्हणून काम केलं. संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्यासाठीच काहीतरी चांगलं करून जाण्याची इच्छा आहे. कारकिर्दीतील शेवटचा पल्ला छाानपैकी सर्वांच्या स्मरणात राहील असा करायचा आहे. शिक्षणासारखं पुण्यकर्म नाही. अनाथांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. या आश्रमात अनाथ मुलांना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाईल. आश्रमाच्या कंपाऊंडमध्ये वृद्धांसाठी छोटं मंदिर असेल. त्यांच्यासाठी झाडं लागवड व शेतीची व्यवस्था केली जाईल. जे जे करता येईल, ते ते करायचं आहे.


विभक्त कुटुंबपद्धती जबाबदार

खरं तर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम बंद व्हावेत यासाठी काम करणं गरजेचं आहे. पण ही काळाची गरज असल्याचंही नाकारता येत नाही. कारण आश्रम नसतील तर या वृद्धांनी जायचं तरी कुठं? अनाथांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? यांसारखे प्रश्नही मनात विचारांचं काहूर माजवतात. त्यामुळं आश्रम सुरू करत आहे. आश्रम बंद व्हावेत यासाठी विभक्त कुटुंबपद्धतीला आळा घालण्याची गरज आहे.


पंतप्रधान व मुख्यमंत्री देणार भेट

दिल्ली दरबारीही दिपालीच्या कामाची दखल घेतली गेली आहे. पंतप्रधान कार्यालयातून दिपालीशी संपर्क साधण्यात आला. जुलै किंवा आॅगस्ट महिन्यात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्रमाच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं दिपालीला सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांची नेमकी तारीख अद्याप समजली नसली तरी लवकरच ती समजणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गुंडेगावातील आश्रमाच्या जागेला भेट देणार असल्याचं दिपाली म्हणाली.हेही वाचा -

'सलमान सोसायटी’ तील चांडाळ चौकडी

पूजा म्हणते, ‘दिल ही तो है’संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा