बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांची ऑनलाइन पेमेंट करताना फसवणूक झालीय. शबाना आझमी यांनी स्वत: एक ट्वीट शेअर करत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिलाय.
ऑनलाइन पेमेंट करताना काही लोकांनी शबाना आझमी यांची फसवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं. एका दारूच्या दुकानातून शबाना आझमी यांनी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. यासाठी त्यांनी आधीच पेमेंट केलं होतं.
अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, ” सावधान..माझी फसवणूक झाली आहे. #Living Liquidz यांना मी ऑर्डर दिली होती. पेमेंटही आधीच केलं होतं. मात्र अद्याप माझ्या ऑर्डरची डिलिवरी झालेली नाही. शिवाय माझा फोन उचलणंही त्यांनी बंद केलंय” असं म्हणत शबाना आझमी यांनी ज्या नंबरवर पेमेंट केलं तो नंबर आणि अकाऊंट नंबरच्या डिटेल्सही दिल्या आहेत.
यानंतर हे ट्वीट चांगलच व्हायरल झालं. त्यानंतर शबाना आझमी यांनी आणखी एक ट्वीट कर या फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्याचं सांगितलं आहे. तसचं लोकांना गंडा घालणाऱ्या या टोळीवर मुंबई पोलिस आणि सायबर सेलनं कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, “लिविंग लिक्विड्सच्या मालकांना ट्रेस करण्यात आलंय. ज्या लोकांनी हे माझ्या सोबत केलंय ते फ्रॉड असून त्यांचा लिविंग लिक्विड्सशी काहीच संबध नाही” असं म्हणत फसवणूक करणाऱ्या या लोकांवर कारवाई होण्याची त्यांनी मागणी केलीय.
हेही वाचा