श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवीने लिहिलं इमोशनल लेटर

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर घराण्यावर शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या जाण्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी कपूरने आपल्या अम्मा विषयीच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.

जान्हवीने सोशल मीडियावर तिच्या आईविषयी एक अतिशय भावूक पत्र लिहिलं आहे. तिने या पत्राद्वारे आपल्या आईचं आणि तिचं नातं उलगडलं आहे. या पत्राबरोबरच तिने आपल्या आईचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमुळे श्रीदेवी यांचं आपल्या कुटुंबाबरोबरचं नातं किती घनिष्ठ होतं हे दिसून येतं.

काय म्हटलंय पत्रात?

'माझ्या आयुष्यात आता तू नसलीस तरीही तुझं प्रेम आजही माझ्यावर आहे. त्याचा अनुभव मला अजूनही येतो आहे. दु:ख आणि त्रास यापासून तू माझं आजही रक्षण करत आहेस, असा भास मला होतो. प्रत्येक वेळी डोळे बंद केल्यावर मला चांगल्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात.’

जान्हवीने हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना सगळ्यांनाच एक संदेश दिला आहे. जान्हवी म्हणते, 'आई- वडिलांच्या नात्याकडे सर्वांनीच आदराने बघावं, ही विनंती आहे. आई आणि बाबांमध्ये असणारं प्रेम हा तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचं प्रेम अमर आहे. कारण त्यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याचा आदर करा. मी आणि खुशीने आमच्या आईला गमावलं. पण बाबांनी तर त्यांची जान गमावलीये. एक आई आणि पत्नी या पलीकडे जाऊन तिने आपली भूमिका कायम निभावली आहे', असं म्हणत जान्हवीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

याआधी अनिल कपूर आणि श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी अशाच प्रकारे पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.


हेही वाचा

'श्रीदेवी यांचा सन्मान राखा', अनिल कपूरने ट्विटरवरून प्रसार माध्यमांना सुनावले!

पुढील बातमी
इतर बातम्या