किशोर कुमार...एक अजब रसायन!

  • मानसी बेंडके & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

हरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शकपटकथालेखक आणि अतरंगी गायक....हुश्श्य...हे सारे गुण असणारा फक्त एकच अवलिया चित्रपटसृष्टीला लाभला. हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून सदाबहार किशोर कुमार आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिलं जातं. अशाच या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचा आज अर्थात 13 ऑक्टोबर हा स्मृतीदिन!

कोणाला घाबरायचे किशोर कुमार?

अशोक कुमार हे अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे किशोर कुमार यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत. किशोर कुमार यांचं नाव आभास कुमार होतं. पण फिल्मी कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपलं नाव बदलून किशोर कुमार ठेवलं. बॉम्बे टॉकिजमध्ये त्यांनी समूहगायक म्हणून काम केलं. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट शिकारी (१९४६)होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती

सौजन्य

संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी १९४६ साली किशोर कुमार यांना 'जिद्दी' या चित्रपटात गाण्याची संधी दिली. 'मरने की दुआएँ क्यों मांगू' असे या गाण्याचे बोल होते. त्यानंतर अनेक चित्रपटात किशोर कुमार यांना गाण्याची संधी मिळाली. पण किशोर कुमार यांना अभिनेता व्हायचे नव्हते. त्यांना गायक बनण्यात रूची होती. पण अशोक कुमार यांना ते घाबरत असत. त्यामुळे ते चित्रपटात देखील काम करत राहिले.

किशोर कुमार संगीत शिकले नाहीत

किशोर कुमार यांनी कधीच संगीताचे धडे गिरवले नाहीत. किशोर कुमार हे के. एल. सैगल यांचे मोठे फॅन होते. त्यांना ते गुरू मानत. त्यामुळे कधी-कधी ते त्यांच्या गाण्यांची नक्कल करत. पण सुप्रसिद्ध संगीतकार सचिन बर्मन यांच्या सल्ल्यानुसार किशोर कुमार यांनी नक्कल करणं सोडून स्वत:ची एक विशिष्ट शैली निर्माण केली. म्हणून आज त्यांची ओळख एक अतरंगी गायक म्हणून आहे.

'नौकरी' चित्रपटाचे संगीतकार सलिल चौधरी हे किशोर कुमार यांना गाण्याची संधी देण्यासाठी इच्छुक नव्हते. कारण किशोर कुमार यांनी संगीतात शिक्षण घेतले नव्हते. पण किशोरजींचं गाणं, आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला आणि किशोरजींना 'नौकरी' या चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी हिंदीसोबतच मराठी, बंगाली, गुजराती भाषांमध्ये देखील गाणी गायली.

किशोर कुमार यांनी चार लग्न केली

किशोर कुमार यांनी आयुष्यात चार लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ सालापर्यंत राहिले. रुमापासून किशोर यांना अमित नावाचा मुलगा झाला. त्यानंतर किशोर यांनी १९६१ साली अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत दुसरे लग्न केले. मधुबालाशी लग्न करण्यासाठी किशोर यांनी धर्मांतर केल्याचंही बोललं जातं. पण २३ फेब्रुवारी १९६९ साली मधुबाला यांचा मृत्यू झाला. १९७६ साली किशोर कुमार यांनी योगिता बालीशी तिसरं लग्न केलं. हे सुद्धा लग्न ९ वर्ष टिकलं. मिथुन चक्रवर्तीमुळे दोघांमध्ये घटस्फोट झाल्याचं बोललं जातं. १९८० साली लीना चंदावरकर हिच्याशी किशोर यांनी चौथं लग्न केलं. लीनापासून किशोर यांना सुमित नावाचा मुलगा झाला.

...म्हणून इंदिरा गांधींचा किशोर यांच्या गाण्यांवर बहिष्कार?

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी विरोध केल्याचं बोललं जातं. किशोर कुमार यांनी विरोध केल्यानं इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मिळकतीवर आयकर विभागाकडून छापे मारायला सुरुवात केल्याची देखील चर्चा होती. याशिवाय किशोर कुमार यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत, असे आदेशही देण्यात आले. यावर उपाय म्हणून किशोर कुमार यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली.

भावाच्या वाढदिवशीच किशोर कुमार यांचा मृत्यू

१३ ऑक्टोबर १९११ साली अशोक कुमार  यांचा जन्म झाला. अशोक कुमार यांचे किशोर कुमार यांच्यावर खूप प्रेम होते. अशोक कुमार यांच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. त्याचवेळी किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तेव्हापासून अशोक कुमार यांनी वाढदिवस साजरा करणं बंद केलं.

किशोर कुमार यांच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी काही...

१) बाबू समजो इशारे

२) हमे थे वो थी

३) एक लडकी भिगी भागी सी

४) सर जो तेरा चक्राए

५) मेरे सामने वाली खिडकी में


हेही वाचा

मलिका-ए-गझल बेगम अख्तर..ठुमरीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी!

पुढील बातमी
इतर बातम्या