‘घाडगे & सून’चं ५०० भागांचं सेलिब्रेशन

अलीकडच्या काळात भारतातही कमी भागांच्या मालिकांचा ट्रेंड रुजत असला, तरी वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिकांचं क्रेझ अद्यापही कमी झालेलं नाही. अशा मालिकांमध्ये सहभागी होत ‘घाडगे & सून’ या मालिकेनं नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला आहे.

केक कापून सेलिब्रेशन

‘घाडगे & सून’ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेनं अल्पावधीतच आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं. वरचेवर कथानकात येणारी उत्कंठावर्धक वळणं रसिकांना या मालिकेत गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत. या बळावरच या मालिकेनं ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेतील मुख्य आणि सहाय्यक भूमिकांमधील कलाकारांसोबत तंत्रज्ञांनीही मोठ्या उत्साहात ‘घाडगे & सून’ने ५०० भाग पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. हे सेलिब्रेशन ‘घाडगे & सून’ची इमेज असलेला केक कापून करण्यात आलं.

नाट्यमय घटना

५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर या मालिकेत आणखी काही उत्कंठावर्धक वळणं येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच नाट्यमय घटना बघायला मिळणार आहेत. घाडगे सदनमध्ये अक्कांच्या येण्यानं माईंना बराच धीर मिळाला, दुसरीकडे अमृता प्रेक्षकांना पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्रामध्ये दिसली. अक्कांनी परत जाताना अक्षयला एक मोठं सत्य सांगितलं. ज्यामुळे आता लवकरच अक्षय आणि कियाराचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. कियारा गरोदर नसल्याचं सत्य अक्षयला कळल्यामुळं तो पूर्णतः खचून गेला आहे. आता पुढे अक्षय कुठले पाउल उचलेल ? कियाराला अक्षय या गोष्टीचा जाब विचारू शकेल का ? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पुढील भागात मिळणार आहेत.

अकी म्हणून हाक मारतात

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा चिन्मय उदगीरकर ५०० भाग पूर्ण केल्याचं औचित्य साधत म्हणाला की, ‘घाडगे & सून’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर खरोखरच विश्वास बसत नाही. असं वाटत की, काल-परवाच शूट सुरू झालं. ही मालिका करताना आम्हाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळत आहे. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्यांपेक्षा वेगवेगळ्या छटा या भूमिकेला आहेत, मी जेव्हा काही कार्यक्रमांना जातो तेव्हा मला प्रेक्षक अकी म्हणून हाक मारतात हीच या व्यक्तिरेखेला आणि माझ्या अभिनयाला मिळालेली पावती आहे.


हेही वाचा - 

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'


पुढील बातमी
इतर बातम्या