Advertisement

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'

आपल्याला आवडत्या विषयावर मनाजोगतं काम करता यावं यासाठी निर्माते बनणाऱ्या या कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री स्मिता तांबे हिचाही समावेश झाला आहे. 'सावट' या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती स्मितानं केली आहे.

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'
SHARES

आज बरेच कलाकार अभिनयासोबतच सिनेनिर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहेत. आपल्याला आवडत्या विषयावर मनाजोगतं काम करता यावं यासाठी निर्माते बनणाऱ्या या कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री स्मिता तांबे हिचाही समावेश झाला आहे. 'सावट' या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती स्मितानं केली आहे.


महिला सशक्तीकरणावरील सिनेमा

इतर कलाकारांप्रमाणं आपणही निर्मितीक्षेत्रात नशीब आजमवावं असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं. त्यासाठी बरेचजण योग्य संधीच्या प्रतीक्षेत असतात. स्मितासाठी 'सावट'च्या निमित्तानं ही संधी चालून आली आणि ती निर्माती बनली. स्मितानं आजवर बऱ्याचदा गंभीर भूमिका साकारल्या आहेत. जवळजवळ मागील १२ वर्षांपासून ती सशक्त स्त्री व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळं एका महिला सशक्तीकरणावरच्या सिनेमाव्दारेच निर्मिती क्षेत्राकडं वळणं स्मितानं पसंत केलं आहे.


सशक्त महिलेचं नवं रूप

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रीलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची निर्मिती निरक्ष फिल्म्स आणि लेटरल वर्क्स प्रा लि. सोबतच स्मिता तांबेच्या रिंगींग रेन प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं करण्यात येत आहे. अभिनयासोबतच सिनेमाची निर्मिती करण्याबाबत स्मिता म्हणाली की, दिग्दर्शक सौरभ जेव्हा माझ्याकडे हा 'सावट' घेऊन आला, तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी सिनेमात काम करण्यासोबतच निर्मिती करायचंही ठरवलं. या सिनेमात एका सशक्त महिलेचं नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल.



सीबीआय ऑफिसर

स्मितानं या सिनेमात इन्स्पेक्टर आदिती देशमुखची भूमिका साकारली आहे. खाकी परीधान केलेल्या नायिकेबाबत स्मिता म्हणाली की, 'उंबरठा' आणि 'जैत रे जैत'मधील दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या भूमिका, 'एक होता विदूषक' सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची 'चौकट राजा'मधली भूमिका, 'उत्तरायण'मधली नीना कुलकर्णींची भूमिका... या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलं आहे. कदाचित त्यामुळेच मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्या असाव्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिकाऱ्याची आहे. ही भूमिका साकारताना आपल्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं भानही राखणं गरजेचं होतं.


महिला सबलीकरण

या चित्रपटात स्मिताच्या जोडीला श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव यांच्याही भूमिका आहेत. जागतिक महिला दिन असलेल्या मार्च महिन्यातच महिला सबलीकरणावर आधारित असलेला 'सावट' प्रदर्शित होणार आहे. या अनोख्या योगायोगाविषयी स्मिता म्हणाली की, खरं तर, सिनेमाची रिलीज डेट ठरवताना, असं मुद्दामहून काहीच ठरवलं नव्हतं. २२ मार्च ही प्रदर्शनाची तारीख नक्की केल्यावर हा योगायोग जुळून आल्याचं लक्षात आलं. आम्हाला काही ठरवून करायचं असतं तर ८ मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या शुक्रवारीच हा सिनेमा प्रदर्शित केला असता. एक सुपरनॅचरल थ्रीलर सिनेमातून महिला सबलीकरणाचा एक वेगळा विचार घेऊन आम्ही मार्चमध्येच येत आहोत ही चांगली बाब आहे.



हेही वाचा -

पुलवामा शहिदांवर अमित्रियानची 'रेड इंक'

तेंडुलकरांच्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ नाटकात नीलकांती पाटेकर?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा