कंगना रणौत मुंबईत दाखल, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत दाखल झाली आहे. कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. नुकताच तिचा मुंबई विमानतळावरील एक फोटो समोर आला आहे. यात तिला CRPF जवानांकडून पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

कंगनाला पाठिंबा देण्यासाठी रामदास आठवले यांचे दोन डझनहून अधिक कार्यकर्तेही मुंबई विमानतळावर हजर आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील काळे झेंडे आणि बॅनर घेऊन दाखल झाले आहेत. ते कंगनाला आपला विरोध दर्शवत आहेत.

विमानतळावर सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आणि सीआयएसएफची मोठी टीम तैनात आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कंगनाला दुस-या गेटमधून बाहेर काढण्यात आले आहे.

मुंबईहून निघण्यापूर्वी कंगनानं एक ट्विट केलं होतं. कंगना म्हणाली की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'

POK वरून केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. त्यावर तिनं ट्विट केलं की, 'अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.'

कंगनाला मिळणाऱ्या धमक्या पाहता केंद्रीय गहमंत्रालयाकडून तिला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. त्यानुसार कंगना मुंबईत येताच तिला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

दरम्यान, कंगनाच्या पाली हिल इथल्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली होती. पण कंगनानं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होईपर्यंत कारवाई थांबवण्यात आली आहे.

पण सध्या कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले ५० पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे.

कारवाई केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनानं लिहलं आहे की ‘बाबर आणि त्याचे सैन्य’. त्यानंतर तिनं आणखी एक ट्विट केलं. त्या तिनं मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तिनं ट्विटमध्ये लिहलं की, “मी कधीच चुकीची नव्हते. माझे शत्रू वारंवार सिद्ध करत असतात की, माझी मुंबई आता पीओके झाली आहे.”


हेही वाचा

पालिकेच्या कारवाईनंतर कंगना पुन्हा बरळली, मुंबईला म्हणाली पाकिस्तान

कंगनाचं कार्यालय बीएमसीने तोडलं

पुढील बातमी
इतर बातम्या