अशी झाली मधुकर तोरडमल यांची इच्छा'तृप्ती'!

मधुकर तोरडमल हे भारतीय नाट्य-सिनेसृष्टीतील फार मोठं नाव. आज जरी ते हयात नसले तरी अभिनयाचा वारसा चालवत त्यांची कन्या तृप्ती अभिनयाकडे वळली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून या चित्रपटात तृप्तीनं मुख्य भूमिका साकारली आहे.

मुलांनीही आपला वारसा पुढे चालवावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. कलाकारही याला अपवाद नाहीत. पण काही कलाकारांची मुलं अभिनयाकडे न वळता इतर क्षेत्रात आपलं करियर घडवतात. कलाकार असलेले सुजाण आई-वडीलही आपल्या मुलांना मुक्तपणे करियर करण्याची मुभा देतात. आपल्या हयातीत नाट्य-सिनेसृष्टी गाजवणारे दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांनीही आपल्या मुलांवर कधीच काही लादलं नाही. पण अापल्या मुलीनंही अभिनयक्षेत्रात करिअर करावं, ही तोरडमल यांची सुप्त इच्छा होती. आज त्यांची कन्या तृप्ती तोरडमल अभिनेत्री व निर्माती बनल्याने त्यांच्या स्वप्नांची इच्छापूर्ती झाली अाहे. हा सर्व प्रवास तृप्तीने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला. 

निर्मितीच करायची होती

खरं तर तृप्तीला निर्माती बनायचं होतं. याबाबत बिनधास्तपणे बोलताना तृप्ती म्हणाली की, अभिनय करण्याचा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. मला सिनेमांची निर्मिती करायची होती. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी माझी चांगली मैत्रीण आहे. आम्ही दोघी एका सिनेमाच्या निमित्तानं संपर्कात होतो. त्या सिनेमाची निर्मिती मी करणार होते.

...आणि अचानक निर्णय बदलला

सिनेमाची पटकथा शिरीष लाटकर यांच्याकडून लिहून घ्यायचं ठरलं होतं. त्यासाठी स्वप्नाताई आणि मी लाटकरांकडे निघालो होतो, तेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर सिनेमा बनवण्याचा विचार असल्याचं स्वप्नाताई सहजपणे म्हणाल्या. ते ऐकून माझी उत्सुकता वाढली आणि त्यांच्याकडून नाटकाबद्दल आणखी माहिती घेतली. ते ऐकल्यावर माझा विचार बदलला आणि कारमधून उतरण्यापूर्वीच आमचा निर्णयही बदलला. आम्ही अगोदर ‘सविता दामोदर परांजपे’ बनवण्याचं ठरवलं.

जॅानलाही संकल्पना आवडली

जाॅन पप्पांचा फॅन आहे. त्यांचं साहित्य, त्यांची नाटकं त्याला खूप आवडतात. त्याच्याशी माझी ओळख पप्पांमुळेच झाली. आमच्या ओळखीची एक व्यक्ती आहे. त्यांच्या माध्यमातून जॅानशी ओळख झाली. त्यानंतर आम्ही मित्र बनलो. त्याला मी बोलता-बोलता ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर सिनेमा बनवण्याबाबत सांगितलं. ते ऐकून जॅानही उत्साहित झाला. त्याने पूर्ण कथा ऐकली आणि निर्मिती करायलाही पुढाकार घेतला.

पप्पाचं स्वप्न साकार

पप्पा खूप लिब्रेटेड होते. त्यांनी कधीच आमच्यावर काहीही लादलं नाही. तुम्हाला हवं ते करा, असं त्यांनी आम्हा तिघी बहिणींना सांगितलं होतं. मी सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. कदाचित मनोमन मी अभिनयही करावा, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच अभिनयाकडेही माझी पावलं वळली असावीत. जाता-जाता व्हिलचेअरवर बसून पप्पांनी सिनेमाची रफ कॅापी पाहिली, तेव्हा स्वप्न सत्यात अवतरल्याचे भाव त्यांच्या डोळ्यांत होते.

रीमाताईंच्या भूमिकेचं आव्हान

‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक खूप गाजलं आहे. रीमा लागू यांनी रंगभूमीवर सजीव केलेली ती भूमिका त्यांच्या अभिनयाप्रमाणेच अजरामर बनली आहे. त्या भूमिकेत जीव ओतण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. देहबोली, संवादफेक यावर अधिक भर दिला.

स्वप्नाताईंमुळे बनलं सोपं

स्वप्नाताईंसोबत अभिनयाचं वर्कशॅाप केलं. प्रथमच कॅमेरा फेस करताना थोडीशी नर्व्हस होते, पण सीन ओके झाला आणि सुबोध भावेंकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. “तोरडमल, बरोबर... वडील आले तुझ्यात”, ही सुबोध यांनी दिलेली प्रतिक्रिया माझा आत्मविश्वास दुणावणारी ठरली. सीन ओके झाला की मी मॅानिटरवर न पाहता स्वप्नाताईंकडे पाहायचे. त्यांनी मान हलवली की जणू मला पोचपावतीच मिळायची.

८०च्या दशकातील नाटक

शेखर ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाखाली १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकात राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहमने केली असून, जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती आहे. तृप्तीसोबत सुबोध भावे आणि राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर आणि सविता प्रभुणे या कलाकारांच्या भूमिका आहेत.


हेही वाचा -

मेघा धाडे बनली ‘बिग बॅास’ची ‘सुपरस्टार’

आपला ‘सैराट’च 'झिंगाट'!


पुढील बातमी
इतर बातम्या