अल्पवयीन स्पर्धक मुलीचं चुंबन घेतल्याचा आरोप असलेला प्रसिद्ध गायक पपॉनने त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन करताना ‘द व्हाॅइस ऑफ इंडिया किड्स-२’ या शोचं परिक्षकपद सोडलं आहे. जोपर्यंत मी याप्रकरणी निर्दोष ठरत नाही, तोपर्यंत परिक्षकपद स्वीकारणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे. रिअॅलिटी शोच्या स्पर्धकासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण, मी काहीही गैर वागलो नाही अशी पोस्ट पपॉनने ट्वीटरवर पोस्ट केली आहे.
मला ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहीत असेल की मी सर्वांशी मिळून मिसळून आणि प्रेमाने वागतो. हा माझा स्वभावच आहे. ज्या ११ वर्षीय मुलीचा उल्लेख केला जात आहे, ती मला तिचा आदर्श मानते. जर माझ्या वागणुकीत काही अक्षेपार्ह असतं, तर मी स्वत:हून व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला असता का? मी सगळ्यांना विनंती करतो की, सगळ्यांनी या विषय इथेच थांबवावा. मी विवाहित असून मला दोन मुलं आहेत. लोकांनी काढलेल्या अर्थामुळे त्या मुलीच्या आणि माझ्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर माझे विचार कितीही शुद्ध असले, तरी एका मुलीला स्पर्श करणं चुकलचं. असं म्हणत त्याने माफीही मागितली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील रूना भुयान यांनी पपॉन विरोधात पोस्को अंतर्गत दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे ११ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पपॉनची बाजू घेतली आहे. पपॉनचे काहीच चुकलं नसल्याचं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
तर, दुसरीकडं बॉलिवूडमधील काहीजण पपॉनच्या विरोधात उभे राहिले आहेत. अभिनेत्री रवीना टंडनने पपॉन विरोधात ट्वीट करत पपॉनने केलेलं कृत्य लाजीरवाणं आणि घृणास्पद आहे. त्यामुळे पपॉनला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.
हेही वाचा-
गायक पपॉन अडचणीत, फेसबुुक लाइव्हवर घेतलं स्पर्धक मुलीचं चुंबन