अमृताने दिवसभरात ओढल्या ४० सिगरेट्स!

  • मुंबई लाइव्ह टीम & संजय घावरे
  • मनोरंजन

‘शो मस्ट गो आॅन’ असं म्हणत काही कलाकार एखाद्या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला मागे पुढे पाहात नाहीत. अभिनयासोबतच नृत्यात पारंगत असलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरही त्यापैकीच एक. अमृताने तिच्या नव्या भूमिकेसाठी धूम्रपानाची रिस्क घेत एका दिवसात चक्क ४० सिगरेट्स ओढल्या.

भूमिकेसाठी वाट्टेल ते...

भूमिकेसाठी रिस्क घेणाऱ्या कलाकारांची भारतीय सिनेसृष्टीत कमतरता नाही. अमिताभ बच्चन, आमिर खान, अनिल कपूर, फरहान अख्तर, ऋषी कपूर, अतुल कुलकर्णी या कलाकारांच्या पावलावर पाऊल टाकत अमृतानेही भूमिकेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दर्शवत आपली व्यक्तीरेखा चोख बजावली आहे.

वेबसीरिजमध्ये पाऊल

धर्मा प्रोडक्शन्सच्या १०० कोटीच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणारी अमृता ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजीटल युगात पाऊल ठेवत आहे. ‘राजी’मध्ये मुनिरा नावाच्या पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या, सोज्वळ रूपात दिसलेली अमृता ‘डॅमेज’मध्ये बोल्ड, ब्युटीफूल आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे.

भूमिकेची गरज म्हणून

बिंधास्त, बेधडक अशा लविनाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अमृताला सिगरेट ओढायची होती. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सिगरेटला कधीही हात न लावणारी अमृता भूमिकेची गरज म्हणून सिगरेट ओढायला तयार झाली खरी, पण तिला ते काही जमत नव्हतं. सिगरेट पकडण्यापासून ते एखाद्या व्यसनी व्यक्तीप्रमाणे सिगरेट ओढण्यासाठीचा सराव अमृताला खूप महागात पडला. शुटिंगच्या दरम्यान तिने एका दिवसात ४० सिगरेट्स ओढल्या. त्यामुळे तिचा घसा बसला. नंतर तब्बल २ आठवडे तिच्या तोंडातून आवाज निघणंच कठीण झालं.

कसून सराव

एरवी सिगरेटच्या नुसत्या वासानेही अस्वस्थ होणारी अमृता सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीवर रागावते. पण ‘डॅमेज’मधील मनोरुग्ण लिवनाची भूमिका रंगवताना तिला स्वत:च सिगरेट ओढणं भाग पडलं. सिगरेट ओढता येत नसल्याने इनहेल करून सिगरेटचा धूर व्यवस्थित सोडणं तिला जमत नव्हतं. दिवसअखेरीस तिला सिगरेट ओढणं जमलं, पण तोपर्यत एका दिवसात तिने चक्क ४० सिगरेट ओढल्या होत्या. खरंच यालाचं म्हणतात डेडिकेशन.


हेही वाचा-

खलनायकी भूमिकेचा ‘अमृता’नुभव

Exclusive: हिरानींच्या ‘संजू’मधील मराठमोळा आवाज


पुढील बातमी
इतर बातम्या