सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

भारतीय संगीत-कला-सामाजिक क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात भारतीय वीर जवानांसह सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-छापेकर आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

३० वर्षांपासून पुरस्कार

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. मागील ३० वर्षांमध्ये आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केलं जातं. यंदा हे पुरस्कार २४ एप्रिल रोजी षणमुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील. 

ह्यांना मिळाले पुरस्कार

संगीत आणि कला क्षेत्रातील शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-छापेकर यांना मा. दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. मा. दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव सलीम खान यांना प्रदान करण्यात येईल. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येईल. हेलन यांना चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केलं जाईल. साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वाग्विलासिनी पुरस्कारानं पुरस्कृत केलं जाईल. 

सोयरे सकाळ

भद्रकाली प्रॉडक्शनचं 'सोयरे सकाळ' हे नाटक मोहन वाघ पुरस्कारानं यंदाचं सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येईल. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तालयोगी आश्रमचे पं. सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार यांना गृह मंत्रालयाअंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था 'भारत के वीर'साठी सम्मानित केलं जाईल. 

जवानांना पुरस्कार समर्पित

सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवतील. आरएसएस प्रमुख मोहन भागवत विजेत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करतील. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना यंदाचा पुरस्कार समर्पित करण्यात येणार आहे. यावेळी भारतरत्न लता मंगेशर वडील मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत शहीदाना श्रद्धांजली स्वरूप एक कोटी रुपये दान म्हणून देतील.


हेही वाचा -

‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता!


पुढील बातमी
इतर बातम्या