समीर वानखेडेंवर लावलेल्या आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...

समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरनं पती समीर वानखेडे यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतरच तिनं हे फोटो शेअर करत मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचं बोललं जातंय.

एकमेकांना वरमाला घालताना आणि नंतर आपल्या पालकांच्या साक्षीने मंदिरामध्ये विवाह करतानाचे दोन फोटो क्रांतीनं पोस्ट केलेत.

या फोटोंना कॅप्शन देताना ती म्हणते, “मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत. समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्यानं २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केलं.”

२००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत समीवर वानखेडे यांनी नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये समीर यांनी क्रांती रेडकरशी विवाह केला.

नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. आता वानखेडेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय.

“मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा

नेटफ्लिक्सवरील 'Squid Game' का ठरतोय लोकप्रियं?

बॉलिवूडनंतर आता क्रिकेटच्या मैदानातही उतरेल 'ही' जोडी

पुढील बातमी
इतर बातम्या