मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर 'तारक मेहता...' मालिकेचे निर्माता नरमले

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेनं आक्रमक पवित्रा घेत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका संवादावर टीका केली होती. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर या मालिकेचे निर्माते नरमले आहेत. मराठी हीच मुंबई आणि महाराष्ट्राची राजभाषा असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका आता वादात सापडली. या मालिकेतील एका डायलॉगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. हेच मराठीचे मारक असं त्यांनी म्हटलं. शिवाय 'या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल,' असं म्हणत अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे.

'या' डायलॉगवर आक्षेप

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका दृष्यात एक कलाकार 'मुंबई की आम भाषा हिंदी हैं' असं वाक्य उच्चारताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ शेअर करत अमेय खोपकर यांनी आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सारवासारव करणारं ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले निर्माते?

'मुंबई ही महाराष्ट्रात आहे आणि आमच्या महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे, यात कोणतीही शंका नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयनही आहे आणि गुजरातीही आहे. सर्व भारतीय भाषांचा मी सन्मान करतो,' असं ट्वीट असित कुमार मोदी यांनी केलं आहे.

नेटकरी संतापले

असित कुमार यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी नेटकरी मात्र त्यांच्यावर संतापले आहेत. अनेकांनी ट्विट करत निर्माते असित कुमार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या भागात झालेली चुक सुधारून पुन्हा प्रसारीत करा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.  

खोपकर यांची फेसबूक पोस्ट

'हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता. मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,' असं म्हणत अमेय कोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.


हेही वाचा

'तारक मेहता की 'मराठी'चे मारक मेहता?', मनसे आक्रमक

'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ नावानं दिला जाणार पुरस्कार

पुढील बातमी
इतर बातम्या