असा होता 'विजूमामां'चा सिनेसृष्टीतला प्रवास

'मोरूची मावशी' या नाटकातील 'मावशी' अजरामर करणारे, रंगभूमीसोबतच सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांचं शुक्रवारी दीर्घ आजरानं निधन झालं.

वयाच्या ६३ व्या वर्षी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात विजय यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कारकिर्दीत मराठी-हिंदी सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि सर्व कलाकारांचे लाडके 'विजूमामां'चा सिनेसृष्टीतला प्रवास कसा होता? जाणून घेऊया....

लालबागमध्ये गेलं बालपण

विजय चव्हाण यांचा जन्म ६ फेब्रुवारी रोजी लालबागमध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण यांचं लहानपण लालबागमधील भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत गेलं. दादरच्या एका इंग्रजी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून बी.ए ची पदवी घेतली.

आणि नाटकांचा प्रवास सुरू

नाटक आणि अभिनयाची जराही आवड नसलेल्या 'विजूमामा' लालबागच्या चाळीत राहत असताना त्यांच्या वडिलांनी एकदा संभाजीची भूमिका साकारण्यास सांगितली होती. परंतु 'भर स्टेजवर मी नाही करणार संभाजीची भूमिका' असं सांगत निघून गेले. त्यानंतर कॉलेजमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून एक नाटक बसवलं होतं. त्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितलं.

फक्त एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर ते रंगमंचावर उभे राहिले आणि ते नाटक यशस्वी झालं. त्यानंतर विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली.

पहिली एकांकिका

विशेष म्हणजे विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकांमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असत. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील, असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचं नाव सुचवलं.

त्यावेळी करियरसाठी हा प्रांत निवडायचा असं त्यांनी काही ठरवलं नव्हतं. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीन एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवलं. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला.

तिघांनी सुरू केली नाट्यसंस्था

अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र. विजय कदम, चव्हाण आणि त्यांचा आणखी एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटूर' नाटक बसवत होते. लक्ष्मीकांत यांनी त्यांना विजय चव्हाण यांचं नाव सुचवलं. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला.

या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळालं. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आलं. त्यावेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एकाच दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी अक्षरशः विक्रम केला.

हास्याचा झरा विजय चव्हाण

'मोरूची मावशी' च्या रुपाने सुरू झालेल्या हास्यप्रवासात तब्बल ४ दशकं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अवलिया कलावंत म्हणजे विजय चव्हाण. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वहिनीची माया' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

त्यांनी मराठी नाट्यसृष्टी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कलाकार म्हणून एंट्री केली असली तरी आपल्या अचूक टायमिंगच्या आधारे त्यांनी तमाम रसिकांचं मन अल्पावधीतच जिंकून घेतलं.

'या' मालिकाही गाजल्या

त्यांच्या श्रीमंत दामोदर पंत हे नाटक असो की ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘भरत आला परत’, ‘जत्रा’, ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका सकरणारे विजुमामाच्या 'रानफूल', 'लाइफ मेंबर' या मालिकाही गाजल्या.

यशस्वीपणे साकारल्या भूमिका 

मराठी सिनेसृष्टीत विजूमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाण यांनी मराठी सिनेसृष्टीसोबतच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'टुरटुर' नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या विजय चव्हाण यांनी 'मोरूची मावशी' या नाटकातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. हे नाटक त्यांच्या कारकिर्दीत मोलाचा दगड ठरलं.

'अण्णा' प्रसिद्ध झाले

श्रीमंत दामोदरपंत या नाटकातील 'अण्णा' हे पात्र सर्वांच्या कायम स्मरणात राहणारं आहे. १५ पेक्षा अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. अनेक सिनेमांमधून विजय मामा मोठ्या पडद्यावर झळकले आणि लक्षातही राहिले. आपल्या प्रदीर्घ सिनेकारकिर्दीत विजूमामांनी नायक, खलनायक, विनोदी अभिनेता, चरित्र अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या.

सर्वांचे लाडके मामा

मराठी सिने-नाट्यसृष्टीतील विनोदाची परंपरा पुढे नेण्यात विजय चव्हाण यांचं मोलाचं योगदान आहे. अगदी दादा कोंडकेंपासून ते आताच्या पिढीतील भरत जाधवपर्यंत अनेक कलाकारांसोबत त्यांनी अगदी सहजतेनं काम केलं.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

विजय चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वीच चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. 'अशी असावी सासू' मधल्या भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे उत्कृष्ट अभिनयाचा राज्य पुरस्कार सलग तीन वर्षे त्यांना मिळाला. त्याशिवाय २०१७ साली त्यांना संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आला.

मोबाइल न वापरणारा माणूस

विजूमामांच्या अभिनयशैलीचं जसं एक वेगळं कोडं होतं, तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाचंही काहीसं अनाकलनीय होतं. विजूमामांनी कधीच मोबाईल वापरलेला नाही. सिनेमांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रभर दौरे करायचे, पण मोबाईल नसल्यानं कधीच त्यांचं काही अडलं नाही. विजूमामांचे कुटुंबियही सिनेमाच्या युनिटमधील एखाद्याच्या मोबाईलवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधायचे.

'या' आजाराने त्रस्त

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित करणारे विजय चव्हाण गेली ४० वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. परंतु गेल्या काही वर्षापासून त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. या आजाराशी ते गेले कित्येक वर्ष झुंज देत होते. परंतु दोन दिवसापूर्वी श्वास घेण्यास जास्त त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कालपासून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी पहाटे अखेर त्यांचं निधन झालं.


हेही वाचा -

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन!

पुढील बातमी
इतर बातम्या