ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार

अनेक हिंदी चित्रपटगीतांना आपल्या सदाबहार संगीताने अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हृदयनाथ यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खय्याम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

या सोहळ्याला मंगेशकर कुटुंबियांसमवेत पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर देखील उपस्थित होत्या. यापूर्वी हा पुरस्कार लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, ए. आर. रेहमान, विश्वनाथन आनंद आणि पं. जसराज यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतीय कलाक्षेत्रातील या दिग्गजांच्या यादीत आता महान संगीतकार खय्याम यांचाही समावेश झाला आहे.

मंगेशकर कुटुंबाचं मोठं योगदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना खय्याम खय्याम यांनी अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. खय्याम म्हणाले की, हृदयनाथ मंगेशकर हे एक मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला मिळणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मंगेशकर कुटुंबाने संगीतक्षेत्रासाठी फार महत्त्वाचं कार्य केलं असल्याचंही खय्याम म्हणाले.

तर, माझ्या नावाचा पुरस्कार खय्याम यांना दिला जाणं हा माझा पुरस्कार असल्याचं मत हृदयनाथ यांनी व्यक्त केलं. खय्यामजी आपल्यासाठी आदर्श असून, त्यांचं प्रत्येक गाणं पाठ असल्याचंही हृदयनाथ म्हणाले.

स्वर्गसुखाचा आनंद देणारा गोडवा

खय्याम यांच्या गाण्यांचा गोडवा स्वर्गसुखाचा आनंद देणारा असल्याचं म्हणत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ९२ वर्षांचे तरुण असलेल्या खय्याम यांचा सन्मान माझ्या हातून होणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा पुरस्कार म्हणजे हिमालयाच्या नावाने हिमालयाला दिलेला पुरस्कार आहे. मंगेशकर कुटुंब ही आपल्या देशाला मिळालेली देणगी आहे. त्यांचा आलेख नेहमी वरच राहिल्याने त्यांनी जनतेच्या मनात सर्वोच्च स्थान पटकावलं आहे.


हेही वाचा-

मी लेस्बियन नाही, राखीचा आरोप तनुश्रीने फेटाळला

#MeToo : अभिनेते अलोक नाथ यांना न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळली


पुढील बातमी
इतर बातम्या