मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, IMD कडून अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात संध्याकाळी ५ वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पावसामुळे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांची तारांबळ उडाली. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या परिसरामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला होता. गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.

मान्सून सक्रिय नसल्याने पावसामध्ये आलेल्या खंडानंतर गुरुवारपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वाऱ्यांची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. यासोबतच कर्नाटकच्या दक्षिणेकडे चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे.

बुधवारी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रभावाअंतर्गत त्यानंतरच्या ४८ तासांमध्ये पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रणालींमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

पालघर, ठाणे, मुंबई येथे शुक्रवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार शुक्रवारी अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या दिवशी मुंबईकरांना तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai Rain : 8 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता">Mumbai Rain : 8 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या