बिबट्या अखेर जेरबंद, ठाणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्यानं कॅडबरी कंपनीत प्रवेश केला होता. त्यानंतर बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरल्याचं स्पष्ट झालं. मात्र सकाळी ५.२९ वाजता बिबट्या मॉलमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीत देखील कैद झाला. यानंतर सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबट्या लपून बसला होता. गेल्या काही तासांपासून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न वन विबागाकडून केला जात होता. अखेर वन विभागाच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

बिबट्यानं मध्यरात्री कॅडबरी कंपनीत प्रवेश करताना एक कर्मचाऱ्यानं पाहिलं होतं. पण काही तासांनंतर बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये वावरताना सीसीटीव्हीत दिसून येत आहे. मॉलमध्ये बिबट्या शिरल्याचं कळताच  वन विभाग आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर बिबट्या सकाळी ५.२९ वाजता मॉलबाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. मॉलमधून बाहेर पडून बिबट्या नेमका गेला कुठे? असा प्रश्न वन विभागाला पडला होता.

पण काही तासांमध्येच वन विभागाला माहिती मिळाली की, बिबट्या सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये लपला आहे. हॉटेलच्या बेसमेंटमध्ये लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं शर्थीचे प्रयत्न केले. त्याला पकडण्यासाठी पिंजरे देखील मागवण्यात आले. सुमारे सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याला भूल देत जेरबंद करण्यात आलं.


हेही वाचा

मुंबईत फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या