मुंबईत उष्णतेची लाट, परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

(File Image)
(File Image)

मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची तिव्रता (Heat) वाढत आहे. वाढत्या उष्णतेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

राजेश टोपे यांनी पीटीआयला माहिती दिली की, सरकार त्यावर उपाययोजना करत आहे. यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी रुग्णालयातील खाटा राखून ठेवणं आणि उष्माघाताच्या व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणं यांचा समावेश आहे.

वृत्तानुसार, मुंबई आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांतील उष्णतेच्या लाटेबाबत भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या इशाऱ्याचा मुद्दा एका आमदारानं विधिमंडळात उपस्थित केला. त्यावर राजेश टोपे यांनी उत्तर दिलं.

टोपे पुढे म्हणाले की, माहिती, शिक्षण आणि संप्रेषण पद्धतीचा उपयोग उष्णतेच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यात आला आहे. IMD नं बुधवारी "यलो अलर्ट" जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील, म्हणाले की, "उष्णतेच्या थकव्याच्या काही सामान्य लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमान, मळमळ, बदललेली मानसिक स्थिती, घामाच्या पद्धतींमध्ये बदल, जलद श्वास घेणे आणि तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. वेळेवर उपचार न केल्यास उष्माघात तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना लवकर नुकसान करू शकतो."

पाटील पुढे म्हणाले, "उपचारास उशीर झाल्यास नुकसान अधिक वाढते, गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूचा धोका वाढतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये उष्णतेच्या थकवाची लक्षणे आढळल्यास, तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, विशेषतः जर एका तासात परिस्थिती सुधारली नाही.

उष्माघात टाळण्यासाठी 'हे' उपाय करा

  • हायड्रेटेड राहणे - पाणी, लिंबू मदत, फळांचे रस, चास/लस्सी इ. उत्तम पर्याय आहेत
  • बाहेर पडताना छत्री, टोपी आणि सनग्लासेस वापरा
  • उन्हाची तीव्रता अधिक असेल तेव्हा घराबाहेर पडू नका
  • दुपारच्या वेळी हवेशीर किंवा वातानुकूलित भागात राहण्याचा प्रयत्न करा
  • जेव्हा तापमान कमी होते तेव्हाच संध्याकाळी मुलांना आणि वृद्धांना बाहेर पडण्यास सांगा
  • हलके सुती कपडे घाला

हेही वाचा

माटुंगा, वडाळाला पुराचा तर चेंबूर, गोवंडीला उष्णतेचा धोका: MCAP

मुंबईकरांनो, काळजी घ्या! पुढचे दोन दिवस उकाड्याचे

पुढील बातमी
इतर बातम्या