एेरोलीत होणार 'ब्ल्यू व्हेल'च्या सांगड्यांचं जतन!

काही दिवसांपूर्वीच उरणच्या किनारपट्टीवर ४५ फुटांचा ब्ल्यू व्हेल मासा मृतावस्थेत सापडला होता. एवढा भलामोठा मासा बघण्यासाठी उरण किनारपट्टीवर एकच गर्दी उसळली होती. तर जानेवारी २०१६ मध्ये जुहू चौपाटीवरही ४२ फुटाचा ब्लू व्हेल मासा मृतावस्थेत आढळला होता. ४२ फुटांच्या माशाला जुहू चौपाटीवर, तर उरणमधील ४५ फुटाच्या माशाला एेरोलीत पुरण्यात आलं. पण ज्यांना हा मासा बघायला मिळाला नाही, त्यांनी नंतर हळहळ व्यक्त केली. परंतु अशा लोकांनी फार निराश होण्याची गरज नाही. कारण मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेल्या ३ वर्षांत जे महाकाय मासे सापडलेत, त्या माशांच्या सांगाड्यांचं जतन संग्रहालयाच्या रुपात होणार आहे. हे राज्यातलं पहिलं सागरी जीव संग्रहालय असेल.

कुठं उभारणार संग्रहालय?

मुंबई कांदळवण कक्षानं मुंबईसह कोकण किनारपट्टीलगत गेल्या ३ वर्षांमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महाकाय माशांच्या सांगाड्यांसह सागरी जीवांचं वैविध्य मुंबईकरांना अऩुभवता यावं यासाठी एेरोली इथं सागरी जीव संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कादंळवण कक्षाच्या मालकीच्या एेरोलीतील जमिनीवर सागरी जीव संग्रहालयाची देखणी आणि भव्यदिव्य इमारत उभारण्यात येणार आहे.

वर्षभरात होणार काम

या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला महिन्याभरात सुरूवात होणार असल्याची माहिती मुंबई कांदळवण कक्षाचे उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून मुंबईकर-नवी मुंबईकर-ठाणेकरांसाठी शक्य तितक्या लवकर हे संग्रहालय बांधून पूर्ण करत खुलं करण्याचा कांदळवण कक्षाचा मानस आहे. त्यामुळे काम सुरू झाल्यापासून वर्षभरात इमारतीचं काम पूर्ण करत हे संग्रहालय खुलं करण्यात येणार असल्याचंही घोडके यांनी स्पष्ट केलं.

अंतिम आराखडा मंजुरीसाठी

या सागरी जीव संग्रहालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं माशांसह कासव आणि इतर सागरी जीवांचे सांगाडेही जतन केले जाणार आहेत. २५ ते ४५ फुटांच्या माशांच्या सांगाड्यांच जतन या संग्रहालयात करायचं असल्यानं संग्रहालयाची रचना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या इमारतीच्या रचनेवर विशेष लक्ष कांदळवण कक्षाकडून देण्यात आलं आहे. 'जायन्ट आॅफ द सी' या संकल्पेनेवर हे संग्रहालय आधारीत असणार असून या संग्रहालयाचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याभरात इमारतीच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

कुठल्या जीवांचा समावेश?

उरण, जुहू, वर्सोवा, वसई या ठिकाणी सापडलेल्या आणि पुरण्यात आलेल्या ब्लू व्हेल, डाॅल्फिन, देवमाशांसह कासव आणि इतर सागरी जीवांना बाहेर काढून त्यांचे सांगडे साफ करण्यात येतील. मग त्या सांगाड्यांवर ट्रिटमेंट करत या सांगाड्याचं जतन संग्रहालयात करण्यात येणार आहे. हे सांगाडे मुंबईकरांना वर्षभरानंतर पाहता येतील, असंही घोडके यांनी सांगतिलं.

दिल्ली, राजकोट, भुवनेश्वर यासह देशातील काही शहरांमध्ये असं सागरी जीव संग्रहालय आहेत. पण मुंबई वा महाराष्ट्रात असं सागरी जीव संग्रहालय नव्हतं. त्यामुळं हे राज्यातील पहिलंवहिल सागरी जीव संग्रहालय असेल, असा दावाही कांदळवण कक्षानं केला आहे.


हेही वाचा-

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?


पुढील बातमी
इतर बातम्या