मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे सबवेकडे जाणारा मुख्य मार्गदेखील बंद करण्यात आला आहे. साचलेल्या पाण्यामध्ये ऑटोरिक्षा आणि इतर वाहनं अडकून पडले असल्याची माहिती देण्यात येत आहे.

सायन भागात षणमुखानंद सभागृह रोडवरील मुख्य रस्ता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या रस्त्यावर झाली आहे. याशिवाय किंग सर्कल आणि हिंदमाता भागात देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुक वळवण्यात आली आहे.

गोल देऊळ, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट अप आणि डाऊन, हिंदमाता अप आणि डाऊन मार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

IMD नं मुंबईला आणि किनारपट्टीवर २४ ते ४८ तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ३ जुलै आणि ४ जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे.


हेही वाचा

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

पुढील बातमी
इतर बातम्या