Cyclone Tauktae : मुंबईसह या परिसरांना परिसराला सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला. शिवाय या चक्रीवादळामुळं सोमवारी मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत सोमवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली.

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोसाटय़ाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत साधारण ७० ते ९० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे.

शनिवार रात्रीपासूनच मुंबईतील वातावरण बदलून गेले. शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली.

रविवारी सांताक्रुझ केंद्राने २६.४ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.

चक्रीवादळामुळं निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना बचावकार्यासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या. सर्व पोलीस ठाण्यांना रात्रपाळीत अधिकाधिक मनुष्यबळ हाती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालिके चा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दल, रुग्णालयांशी समन्वय ठेवावा, अशाही सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. पाणी साचल्यास, वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्यास रुग्णवाहिका, प्राणवायू वाहून नेणारी आणि आरोग्य सेवकांची वाहने खोळंबू नयेत, याची काळजी घ्यावी.

किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये ३८९६, सिंधुदुर्ग १४४ आणि रायगडमध्ये ५,९४२ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


हेही वाचा - 

Cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर

पुढील बातमी
इतर बातम्या