मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

मुंबईत इथून पुढे देशी झाडांचीच लागवड केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

स्थानिक प्रजातींच्या झाडांऐवजी इतर प्रजातींची झाडे लावल्यास ती मुंबईच्या मातीमध्ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. त्यामुळे ही झाडे उन्मळून पडण्याचा धोका असतो. त्यामुळे मुंबईतील मातीची वैशिष्टय़े लक्षात घेऊन ४१ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार यापुढे मुंबईत पालिकेतर्फे तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यांसारखी झाडे लावण्यात येणार आहेत.  नागरिकांनी त्यांच्या सोसायटीच्या आवारात स्थानिक प्रजातींचीच झाडे लावावीत, असंही आवाहन  आयुक्त चहल यांनी केलं आहे.

मुंबईत याआधी पर्जन्यवृक्ष लावण्यात आले होते. मात्र, या झाडांवर विशिष्ट प्रकारचे किडे आढळून आले. या किड्यांचा प्रसार वेगाने झाल्यामुळे मुंबईतील पर्जन्यवृक्ष  पोखरून उन्मळून पडू लागले होते. त्यानंतर मुंबईत देशी झाडे लावण्याचा विचार व्यक्त होऊ लागला होता.

ही झाडे लावण्यात येणार

वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा 



हेही वाचा -

  1. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या