मुंबईत परतीच्या पावसाला सुरूवात; मुंबईकरांची तारांबळ

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं मुंबई आणि परिसरात पुनरागमन केलं अाहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुलाबा, दादर, नरिमन पॉईंट, मलबार हिल यांसह विविध ठिकाणी विजेच्या कडाकटासह पावसानं हजेरी लावली.  मुंबईत पावसाला सुरूवात होण्यापूर्वी नवी मुंबई परिसरात देखील मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची मात्र तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. 

कमी दाबाचा पट्टा 

हवामान विभागानं मुंबईसह, मराठवाडा आणि विदर्भात २७ अाणि २८ सप्टेंबर या दोन दिवसात गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त  केला अाहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, पालघर, वसई यांसह इतरत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर गुरूवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईसह इतरत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. वाऱ्यामुळे सर्वत्र धुरळा उडाला होता. धुरळ्यानं नागरिकांसह वाहनधारकही त्रस्त झाले.


पुढील बातमी
इतर बातम्या