'आनंदयात्री'च्या सुरावटीवर पुलंच्या आठवणींची मैफल

दिग्दर्शक महेश मांजरेकांनी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही पुलं अवतरले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या 'आनंदयात्री' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुलं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहेत.

कारकिर्द अनुभवायला मिळणार

स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य आनंदानं भरुन टाकणाऱ्या आणि शब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा 'आनंदयात्री' हा कार्यक्रम दिग्गजांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीचा वेध घेणारा आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या भागात बाबूजी म्हणजेच दिवंगत संगीतकार सुधीर फडके यांच्या सांगीतिक जीवनप्रवास उलगडल्यानंतर आता पु. ल. देशपांडे 'आनंदयात्री'चे सहप्रवासी बनले आहेत. म्हणजेच पुढील भागात पुलंची कारकिर्द अनुभवायला मिळणार आहे.

पुणेकरांसाठी पर्वणी

पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे नुकत्याच पार पडलेला हा खास सोहळा पुणेकरांसाठी अनोखी पर्वणी देणारा ठरला. लेखक, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या पुलंनी आपल्या विविध कलांच्या माध्यमांतून महाराष्ट्राला समृद्ध केलं आहे. पुलंच्या याच समृद्ध कलेचा ठेवा 'आनंदयात्री' या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडण्यात आला.

अजरामर व्यक्तिरेखा

पं. शौनक अभिषेकी, जयदीप वैद्य, नचिकेत लेले, सावनी दातार-कुलकर्णी, चंद्रकांत काळे, मधुरा दातार आणि मुग्धा वैशंपायन या सुप्रसिद्ध गायकांनी पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकलं. अभिनेते संजय मोने, आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री यांनी पु. लं.च्या साहित्यातील अजरामर व्यक्तिरेखा पुन्हा रंगमंचावर जिवंत केल्या. पुलंनी संगीतबद्ध केलेल्या 'वायदा केला...' या गाण्यावर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनिसने ठेका धरत 'आनंदयात्री'ची मैफल संस्मरणीय केली. अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

आनंदयात्री एक परंपरा

'आनंदयात्री' हा फक्त कार्यक्रम नसून एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्तानं मानवंदना देण्यात येणार आहे. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल याची खात्री असल्याचं स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले.


हेही वाचा -

प्रवाशांकरीता मुंबई सेंट्रल स्थानकात ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती

श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुकेश अंबानी १० व्या स्थानावर


पुढील बातमी
इतर बातम्या