'श्री गुरुदेव दत्त' म्हणत निशिगंधा वाड आणि दिपक देऊळकर यांचं पुनरागमन

मराठी चित्रपटसृष्टीतील दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड ही जोडी छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

मूळ अवताराची कथा

स्टार प्रवाहवर १७ जूनपासून सुरू होणाऱ्या 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेच्या निर्मात्यांच्या रुपात दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. दत्तसंप्रदाय खूप मोठा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात दत्तगुरूंचे अनुयायी आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थांपासून ते अगदी शंकर महाराजांपर्यंत दत्तगुरूंचे बरेच अवतार असले तरी मूळ मात्र एकच. त्याच मूळ अवताराची कथा 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेत पहायला मिळणार आहे. दत्तगुरूंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनुसुयेसोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

लेखन स्वामी बाळ यांचं

श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसंच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच 'त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त' असं पुराणांमध्ये दत्तगुरूंचं वर्णन केलं आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केलं गेलं आहे. दत्तगुरूंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव ठरणार आहे. या मालिकेचं लेखन स्वामी बाळ यांनी केलं आहे.

अद्भुत कथा 

मालिकेच्या माध्यमातून प्रथमच दत्तगुरूंची महती प्रेक्षंसमोर आणण्याबद्दल स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरू. दत्तगुरूंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.


हेही वाचा  -

जान्हवीचा डबल रोल असलेल्या 'रुह अफ्जा'चं शूटिंग सुरू

अनाथांची नाथ बनली तेजस्विनी


पुढील बातमी
इतर बातम्या