माऊंट मेरी जत्रेचा आनंद लुटा, पण या ३ गोष्टींची काळजीही घ्या!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

तब्बल ३०० वर्षांचा इतिहास असणारी 'माऊंट मेरी'ची जत्रा म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतिक. मदर मेरीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आठवडाभर या जत्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदा १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या काळात ही जत्रा भरवण्यात आलीय. तसं

पाहायला गेल्यास मुंबईतली ही एकमेव अधिकृत 'जत्रा' अद्यापही तग धरून आहे. त्यामुळंच केवळ ख्रिश्चन धर्मिय नव्हे, तर सर्वच धर्मांतील भाविक मोठ्या भक्तीभावानं मदर मेरीचं दर्शन घ्यायला आणि जत्रेची धम्माल अनुभवायला येतात. पण अनेकदा ही धम्माल अनुभवताना या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा काही त्रास होत असेल का? याची जाणीवही अनेकांना होत नाही.

म्हणूनच 'माऊंट मेरी' जत्रा सुरू झाल्यापासून चर्च परिसरात राहणारे शेकडो रहिवासी सध्या वाहतूककोंडी, ध्वनी प्रदूषण, कचरा आणि प्रचंड गर्दीने हैराण झाले आहेत. अनेकांनी पोलिसांना तशी तक्रारही केलीय.

चर्च प्रशासन, मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था दरवर्षी योग्य नियोजन करत स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून जत्रेचं नियोजन करतात, पण काही जणांच्या छोट्याच्या चुकीचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. त्यामुळं तुम्ही यंदा 'माऊंट मेरी' जत्रेला जाण्याचा बेत आखत असाल, तर पुढील तीन गोष्टींवर नक्कीच भर द्या, जेणेकरून तुम्हालाही जत्रेचा आनंद मिळेल अन् त्याचा इतरांनाही त्रास होणार नाही.

वाहतूककोंडी टाळा

  • 'माऊंट मेरी' जत्रेला दररोज ३० हजार ते ५० हजार भाविक येतात. हा आकडा शनिवारी, रविवारी आणखी वाढेल. त्यामुळं जत्रेला जाताना शक्यतो खासगी वाहन नेण्याचं टाळा. रेल्वेने वांद्रे स्थानकापर्यंत येऊन पुढे तुम्हाला बेस्ट बसने चर्चपर्यंत जाता येईल. त्यासाठी बेस्टने ज्यादा बस सोडल्या आहेत. बेस्टच्या २१४, २१५, ८६, २११, २१२, २२२ क्रमांकाच्या बसचा तुम्हाला वापर करता येईल.
  • या काळात एस. व्ही. रोड आणि लिंक रोड या दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूककोंडी होते. वाहतूक पोलिसांनी माऊंट मेरी रोड, चॅपेल रोड, सेंट जाॅन रोड, केन रोड आणि रिबेलो रोड हे पूर्णपणे बंद ठेवले आहेत. त्यामुळे हे रोड टाळूनच पुढे या.
  • जत्रा सुरू झाल्यापासून दररोज १०० टू व्हिलर आणि १५ फोर व्हिलर गाड्या वाहतूक पोलीस उचलून नेत आहेत. वाहने कुठल्याही सोसायटीच्या गेटपुढे पार्क केल्यामुळे रहिवाशांनाही त्याचा त्रास हाेतो. त्यामुळे खाजगी वाहने असतील, तर कुठेही पार्क करू नका.

ध्वनी प्रदूषण टाळा

चर्च परिसरात गेल्या वर्षी ५० डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्यात आली होती. या परिसरात राहणाऱ्या गरोदर महिला, वृद्ध, लहान मुलांना जत्रेच्या दिवसांत प्रचंड ध्वनी प्रदूषणालाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळं उगाच आरडा ओरडी करणं, पिपाण्या वाजवणं, वाहनांचे हाॅर्न वाजवणं शक्यतो टाळा.

कचरा करण्याचं टाळा

जत्रा म्हटलं की चविष्ट खाद्यपदार्थ आलेच. हे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कागद किंवा प्लास्टीकचे रॅपर्स, बाॅक्स कुठेही रस्त्यावर फेकू नका, त्यासाठी कचराकुंडीचा आवर्जून वापर करा. जत्रेच्या दिवसांत या परिसरातून दरदिवशी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. हा कचरा महापालिका कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं साफ केला जातो. त्यामुळं आवर्जून कचरापेट्यांचा वापर करा.

माऊंट मेरी चर्चचं वैशिष्ट्य

८ सप्टेंबर हा 'मदर मेरी'चा वाढदिवस. त्यामुळे दरवर्षी ८ सप्टेंबर नंतर येणाऱ्या रविवारपासून पुढचे आठ दिवस भव्य जत्रा भरविण्यात येते. डोंगरावर बनविण्यात आलेली माऊंट मेरी चर्च (बासिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट) ही देशातील सुंदर चर्चपैकी एक चर्च असल्याचे मानले जाते. १६४० मध्ये बांधलेल्या या चर्चला पाडून १७६१ मध्ये पुन्हा एकदा उभारण्यात आले. गेल्या ३०० वर्षांपासून येथे भरविण्यात येणारी जत्रा ही मुंबईचे वैशिष्ट्य आहे.


हे देखील वाचा -

माऊंट मेरी जत्रेसाठी बेस्टच्या ज्यादा बस


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या