असा दसरा का साजरा करू नये?

  • चेतन काशीकर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतो. पण ही आपट्याची पाने का वाटली जातात? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल.

पर्यावरण प्रेमी विजय लिमये म्हणतात, दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामुळे कोणता लाभ होतो असा कोणत्याही पौराणिक कथेत उल्लेख नाही किंवा त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

पाने ही झाडांची फुफ्फुसे आहेत. झाडे हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि हवेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडतात.

पावसाळा संपत आलेला असताना झाडांना पालवी फुटून, कोवळी पाने तयार झालेली असतात. हीच पाने या झाडांसाठी अन्न बनवण्याचे प्रमुख काम करतात. त्यामुळे झाडांची पाने मोठ्या प्रमाणात तोडली गेली, तर त्याचा फटका आपल्या सर्वांनाच बसू शकतो.

दसऱ्याच्या निमित्ताने विक्रेते भरमसाठ पाने तोडून बाजारात विक्रीसाठी आणतात. त्यापैकी काही आपट्यांच्या पानांचीच विक्री होते. त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी घरी निघून जातात. यामुळे कळत-नकळत बाजारात कचरा होण्यास आपणच कारणीभूत होतो. याव्यतिरिक्त दसऱ्याच्या दिवशी ही आपट्याची पाने वाटल्यानंतर त्याचाही कचराच होतो, असेही लिमये म्हणतात.

बाजारात जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, चाफा यांसारखी फुले सहज उपलब्ध असतात. त्यामुळे ही फुले वाटून वेगळ्या पद्धतीने दसरा साजरा करण्याचे ठरवले, तर ते पर्यावरणासाठीच नाही तर आपल्यासाठीही फायद्याचे ठरू शकणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

पालिकेचे कर्मचारी कचरा साफ करत नाहीत म्हणून आपण ओरडतो. मुळात कचरा केलाच नाही, तर साफ करण्याचा विषयच येणार नाही. याचा आपल्यासारख्या सुजाण, सुसंस्कृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची आणि अंमलात आणण्याची वेळ आली आहे. प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे. मग या दसऱ्यापासून त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे.

विजय लिमये, पर्यावरण प्रेमी


हेही वाचा - 

दादर फुल बाजारात झेंडूने खाल्ला भाव

पुढील बातमी
इतर बातम्या